No title

देह व्यवसायाच्या जाळ्यातून महिलांची सुटका,अल्पवयीन मुलींचा समावेश.


📍28 महिला आणि 14 पुरुष आरोपींवर गुन्हे दाखल.


एस.के.24 तास 


नागपूर : अनैतिक मानवी तस्करी आणि देहव्यवसायाच्या जाळ्याला आळा घालण्यासाठी पोलिसांनी सुरू केलेल्या " ऑपरेशन शक्ती " मोहिमेत शहरात मोठी कारवाई करण्यात आली. गेल्या काही महिन्यांत पोलिसांनी केलेल्या धडक कारवायांमधून 85 महिलांची देहव्यवसायाच्या दलदलीतून सुटका करण्यात आली.

धक्कादायक बाब म्हणजे यात 8 अल्पवयीन मुलींचाही समावेश आहे. कमी वेळेत अधिक पैसा कमावण्याचे आमिष दाखवून या मुलींना देहव्यवसायात ढकलण्यात येत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक पथक आणि सामाजिक सुरक्षा विभागाने शहरातील विविध भागात गुप्त माहितीच्या आधारे धडक कारवाया केल्या. या कारवायांमध्ये 77 सज्ञान तरुण महिलांची सुटका करण्यात आली.तर 8 अल्पवयीन मुलींना मध्यस्थांच्या तावडीतून सोडवण्यात आले.आर्थिक दुर्बलता, रोजगाराचा अभाव आणि फसव्या आमिषांमुळे अनेक महिलांना या दलदलीत ढकलले जात असल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवायांमध्ये गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने सर्वाधिक 31 कारवाया केल्या. या धाडीतून 62 पीडितांची सुटका करण्यात आली. त्यापैकी 56 सज्ञान तर 6 अज्ञात पीडितांचा समावेश आहे. या प्रकरणांमध्ये 25 महिला आणि 37 पुरुष आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अनैतिक मानवी वाहतूक पथकाने देखील कारवाया करत 4 पीडितांची सुटका केली असून 3 महिला आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय इतर पोलिस युनिट कडून 4 कारवाया करण्यात आल्या. त्यातून 4 पीडितांची सुटका झाली असून 2 महिला आणि 6 पुरुष आरोपींवर गुन्हे दाखल झाले.

विविध पोलीस ठाण्यांकडून 14 कारवाया करण्यात आल्या. त्यामध्ये 6 सज्ञान आणि 2 अल्पवयीन अशा 10 पीडितांची सुटका करण्यात आली. या प्रकरणांमध्ये 28 महिला आणि 14 पुरुष आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले. 

एकूणच 100 हून अधिक कारवायांमधून 77 सज्ञान आणि 8 अल्पवयीन अशा 85 पीडितांना देहव्यवसायाच्या जाळ्यातून मुक्त करण्यात आले. विशेष म्हणजे या गुन्ह्यांमध्ये महिला आरोपींचा टक्का मोठा असल्याचेही या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

आर्थिक अडचणी, रोजगाराच्या खोट्या आश्वासनांचा आमिष आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांना जाळ्यात ओढण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा रॅकेटचा शोध घेण्यासाठी गुप्त माहितीच्या आधारे चालू वर्षात 2026 मध्ये आतापर्यंत सामाजिक सुरक्षा विभाग आणि अनैतिक मानवी वाहतूक पथकाने प्रत्येकी दोन कारवाया केल्या आहेत. 

पुढील काळातही अशाच प्रकारे कडक कारवाई सुरू ठेवण्यात येणार आहे. – असे राहुल शिरे, (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सामाजिक सुरक्षा विभाग) यांनी सांगितले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !