मुल तालुक्यातील ताडाळा गावात वाघाची दहशत ; ग्रामस्थांत भीतीचे वातावरण.
एस.के.24 तास
मुल : मुल तालुक्यातील ताडाळा या गावात मागील दोन दिवसांपासून वाघाची मोठ्या प्रमाणात दहशत पसरली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.दिनांक,13 व 14 मार्च रोजी सलग दोन दिवस गावाच्या परिसरात वाघाचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 13 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास गावातील वैभव सोयाम यांच्या पाळीव कुत्र्यावर वाघाने हल्ला करून त्याला ठार केले.या घटनेमुळे गावकरी अधिकच घाबरले असून रात्रीच्या वेळी बाहेर पडण्यास नागरिक टाळत आहेत.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 14 मार्च रोजी रात्री सुमारे 11:00. वाजण्याच्या सुमारास तोच वाघ पुन्हा गावात आल्याचे दिसून आले.यावेळी वाघ वैभव सोयाम यांच्या कुक्कुटपालन शेडजवळ फिरताना दिसल्याची माहिती शरद बामने ग्रामस्थांनी दिली.
सलग दोन दिवस गावात वाघाचे दर्शन झाल्याने ताडाळा गावासह परिसरातील नागरिकांमध्ये मोठी भीती पसरली आहे. विशेषतः शेतकरी,गुराखी आणि रात्री नागरिकांना मोठा धोका निर्माण झाला आहे.अनेक ग्रामस्थांनी रात्रीच्या वेळी घराबाहेर न पडण्याचा निर्णय घेतला असून लहान मुले व महिलांच्या सुरक्षेबाबतही पालक चिंतेत आहेत.या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.
वाघाचा तात्काळ बंदोबस्त करून गावकऱ्यांना सुरक्षितता द्यावी,अशी मागणी ताडाळा गावातील नागरिकांनी वनविभाग चिचपल्ली यांच्याकडे केली आहे. तसेच वनविभागाने त्वरित पथक पाठवून परिसरात पाहणी करावी व आवश्यक ती उपाययोजना करावी, अशीही मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
गावातील नागरिकांनीही सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत असून रात्रीच्या वेळी एकट्याने बाहेर न पडणे,शेतात जाताना समूहाने जाणे आणि जनावरांची योग्य काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे.गावातील परिस्थिती लक्षात घेता वनविभागाने तातडीने कारवाई करावी,अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

