बोगस महिला डॉक्टर प्रकरणात फक्त हमीपत्रावर प्रकरण मिटविल्याने स्थानिकांमध्ये तीव्र संताप ; बोगस डॉक्टर विरोधातील मोहिम ही केवळ कागदावर.
📍आरोग्य विभागाची गंभीर दिरंगाई,फौजदारी कारवाई टाळल्याने अजून हिंमत वाढण्याची शक्यता.
एस.के.24 तास
एटापल्ली : बोगस डॉक्टरीविरोधात जिल्हाधिकार्यांनी आदेशित केलेल्या मोहिमेनंतर आरोग्य विभागाने जारावंडी येथे एका महिलेला औषधोपचार करताना रंगेहात पकडले.ही कारवाई २५ जुलै रोजी झाली.परंतु आज पाच दिवस उलटल्यानंतरही,सदर महिले विरोधात कोणतीही ठोस कायदेशीर कारवाई झालेली नाही,फक्त स्टॅम्प पेपरवर " पुढे प्रॅक्टिस करणार नाही " अशा स्वरूपाचे हमीपत्र घेण्यात आले.यामुळे नागरीकातून संताप व्यक्त केला जात आहे.
आरोग्य विभागाची गंभीर दिरंगाई, फौजदारी कारवाई टाळल्याने संतापाची लाट : -
विशेष म्हणजे, २४ जुलै रोजीच या महिलेचा पती बोगस डॉक्टर म्हणून पंचायत समिती एटापल्ली येथे चौकशीसाठी बोलावण्यात आला होता. त्याच्याकडे देखील कोणतीही वैद्यकीय पात्रतेची कागदपत्रे सापडली नाहीत.
त्याच्याकडून देखील हमीपत्र लिहून घेतले गेले की " पुढे असं कृत्य करणार नाही. " पण दुसर्याच दिवशी त्याचीच पत्नी जारावंडी येथे रुग्णांवर औषधोपचार करताना रंगेहात पकडली गेली.
चौकशीसाठी या महिलेस जारावंडी पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आले,परंतु काही वेळातच तिला सोडून देण्यात आले.आता पाच दिवसांनंतर देखील केवळ हमीपत्रावर प्रकरण मिटविल्या गेल्याचे समजल्यावर स्थानिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. यामुळे बोगस डॉक्टरीविरोधातील मोहिम ही केवळ कागदावर मर्यादित राहणार की प्रत्यक्षात काही घडणार,असा सवाल आता जनतेतून जोरात उपस्थित केला जात आहे.