एटापल्ली तालुक्यात जखमी रुग्णाला खाटेची कावड करून रुग्णवाहिकेपर्यंत नेण्यात आले ; कुरखेडा कोरची राष्ट्रीय महामार्गावरील चिखलात गरोदर महिलेला घेऊन जाणारी रुग्णवाहिका फसल्याने ट्रॅक्टरच्या साहाय्याने काढावी लागली.
📍सामान्य जनता वाऱ्यावर त्या घटनांवरून नेटकऱ्यांचा मुख्यमंत्र्यांवर संताप.
एस.के.24 तास
एटापल्ली : मागील पाच वर्षांत आधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. या काळात येथील खाणींसाठी सर्व सुविधा उपलब्ध झाल्या.दुर्गम भागातील सर्वसामान्य नागरिक व आदिवासींसाठी आरोग्य, शिक्षण आणि रस्ते या पायाभूत सुविधा निर्माण कारण्यात सरकारला अद्याप यश आले नाही. त्यामुळेच दरवर्षी खाटेच्या कावडीतून आजारी रुग्णांना न्यावे लागते.
तर कधी पक्के रस्ते नसल्याने रुग्णवाहिका तिथपर्यंत पोहोचत नाही. काल एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम पेंदूळवाहीच्या घटनेनंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करीत “सरकारचे केवळ गडचिरोलीतील खाणींकडे लक्ष असून सामान्य नागरिकांना वाऱ्यावर सोडण्यात आले ” अशी टीका केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली, धानोरा, भामरागड, अहेरी सारख्या तालुक्यातील दुर्गम भागात नक्षलवादामुळे विकास रखडला अशी ओरड प्रशासनाकडून होत होती. परंतु मागील पाच वर्षात या भागातील नक्षलवादाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.
पोलिसांच्या रेकॉर्डनुसार उत्तर गडचिरोलीतील नक्षलवाद संपुष्टात आला असून जिल्ह्यात केवळ बोटावर मोजण्याइतकेच नक्षलवादी सक्रिय आहे. तरीसुद्धा दक्षिण गडचिरोलीतील अपुऱ्या पायाभूत सुविधा कायम चर्चेत येत असल्याने राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्तीवर आता नागरिकांनी शंका व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
२ आगस्ट रोजी जिल्ह्यातील दक्षिण आणि उत्तर भागात घडलेल्या दोन प्रसंगांवरून राजकीय वातावरण तर तापले आहेच, सोबत समाज माध्यमावर देखील जिल्ह्यातील युवकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.
एटापल्ली तालुक्यात रस्त्याअभावी जखमी रुग्णाला खाटेची कावड करून रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचवण्यात आले. तर कुरखेडा कोरची राष्ट्रीय महामार्गावरील चिखलात गरोदर महिलेला घेऊन जाणारी रुग्णवाहिका फसल्याने ट्रॅक्टरच्या साहाय्याने काढावी लागली.
यावरून काँग्रेसचे नेते विजय वाडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे. तर नेटकऱ्यांनी “खाणीसाठी सर्व सोयी उपलब्ध होतात, परंतु आम्हाला कुणी विचारत नाही. देवेंद्र फडणवीस तीन वर्षापासून गडचिरोलीचे पालकमंत्री आहे. तरीसुद्धा परिस्थिती " जैसे थे ” असल्याची टीका चारही बाजुने करण्यात येत आहे.
महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनवायचंय म्हणे, पण जमिनीवर आदिवासी अजूनही रुग्णालयात पोहोचण्याआधीच जीव गमावताय, खऱ्या महाराष्ट्राचं चित्र झाकून टाकायचं आणि हे फसवे आकडे,योजना, परदेशी दौरे,गुंतवणूक परिषदा हा सगळा दिखावा करायचा,कशासाठी ?
ज्यांच्या हातात मुख्यमंत्रीपद होतं आणि ज्यांनी आता उपमुख्यमंत्रीपद घेतलं ते एकनाथ शिंदे आणि आता विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही पालकमंत्री म्हणून ज्या जिल्ह्यांत गेले, तिथे आरोग्य यंत्रणांची अवस्था काय आहे, हे या व्हिडिओतून दिसतं. हा केवळ व्हिडिओ नाहीतर तर निष्क्रिय महायुती सरकारच्या कारभाराचा आरसा आहे.
जिथं आजही पायाला चप्पल नाही, आजारी माणूस झोळीतून रुग्णालयात जातोय आणि हे मंत्रीसाहेब मात्र हवेत उड्डाणं करतायत, महायुतीचे सहपालकमंत्री काय तर " पद " घेऊन बसलेत, पण जबाबदारीपासून कोसो दूर पळतात. - आ.विजय वडेट्टीवार,विधिमंडळ नेते काँग्रेस