नागभीड तालुक्यातील चिंधीचक येथील निवासी आदिवासी कन्याआश्रम शाळेतील 10 वी च्या विद्यार्थिनीचा मृत्यू ; कारण अस्पष्ट.
एस.के.24 तास
नागभीड : चिमूर प्रकल्पांतर्गत असलेल्या चिंधीचक येथील निवासी आदिवासी कन्या आश्रम शाळेत 10 वी च्या विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.
समीक्षा पुरूषोत्तम चौधरी रा. जामसाळा (सिंदेवाही) असे मृत विद्यार्थीनीचे नाव असून ती 10 वी मध्ये शिकत होती.तिची अचानक प्रकृती बिघडून मृत्यू झाल्याने तिच्या कुटूंबियावर शोककळा पसरली आहे. तिच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे.
चिमूर प्रकल्पांतर्गत जांभूळघाट,चिंधीचक, कोसंबी गवळी व चंदनखेडा ह्या शासकिय आदिवासी आश्रम शाळा चालविल्या जात आहेत. त्यापैकी चिंधीचक येथे फक्त मुलींसाठीच आदिवासी कन्या आश्रमशाळा कार्यान्वित आहे.या ठिकाणी आदिवासी समाजातील मुलींना निवासी राहून शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे.
ठिकठिकाणच्या मुली या ठिकाणी निवासी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत असलेली समीक्षा हिची सोमवारी (दि. 1) रात्री आठच्या सुमारास अचानक प्रकृती बिघडली. तिला खोकला येऊ लागला व उलटी सुरू झाली.
श्वास घेणे अडचणीचे ठरू लागल्याने लगेच शाळेचे मुख्याध्यापक, अधीक्षक व कर्मचाऱ्यांनी तिला नागभीड येथील ग्रामीण रूग्णालयामध्ये भरती केले. त्याचवेळी आईवडिलांना माहिती देण्यात आली व काही कर्मचाऱ्यांना आई वडिलांना आणण्यासाठी पाठविण्यात आले. नागभीड येथील रूग्णालत प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रकृती अत्यवस्थ होत असल्याने तिला ब्रह्मपुरी येथील खासगी रूग्णालयात हलविण्यात आले.
परंतु त्या ठिकाणीही प्रकृती बिघडली. तिला श्वास घेणे अडचणीचे ठरू लागले. ऑक्सिजन लेव्हल कमी होऊ लागली आणि हार्ट बिट वाढत असल्याने तेथेही डॉक्टरांनी नागपूरला हलविण्याचा सल्ला दिला.
येथे ईसीजी काढण्यात आला. त्यानंतर वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता तिला मृत घोषीत केले, रात्रीच्या दोन सव्वादोनच्या सुमारास मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी मंगळवारी शासकिय वैद्यकिय महाविद्यालयातच शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह आईवडिलांना सोपवून मृतदेह सिंदेवाही तालुक्यातील जामसाळा येथे आणण्यात आला. सायंकाळी तिच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात आले.
इयत्ता दहावीमध्ये शिकत असलेल्या समीक्षाच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही,त्यामुळे मृत्यू कशाने झाला ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. समीक्षा पाचवी पासून चिंधीचक येथे शिक्षण घेत होती.तिची बहिण याच शाळेमध्ये इयत्ता सातवी मध्ये शिक्षण घेत आहे.
तिच्या पश्चात आई वडिल, बहिण असा परिवार आहे. तिचा मृत्यू हदयाशी संबंधित आजाराने झाला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.शवविच्छेदनाच्या अहवालातूनच मृत्यूचे खरे कारण समोर येऊ शकते.