गडचिरोली शहरातील लांजेडा वार्डात पैशांच्या देवाण - घेवाणी वरून भर दिवसा निर्घृण खून ; आरोपी फरार…!

गडचिरोली शहरातील लांजेडा वार्डात पैशांच्या देवाण - घेवाणी वरून भर दिवसा निर्घृण खून ; आरोपी फरार…!


एस.के.24 तास 


गडचिरोली : गडचिरोली शहरातील लांजेडा वार्डात भर दिवसा एका 35 वर्षीय युवकाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी सुमारे साडेचार वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


मृतकाचे नाव सचिन कोल्हुरवार वय,35 वर्ष असे असून तो विवेकानंद नगर येथील रहिवासी होता.सचिन संविधान चौक परिसरात जनरल स्टोअर चालवत होता.आरोपीचे नाव महेश बुरांडे असे असून दोघांमध्ये गेल्या काही वर्षांपासून पैशांच्या व्यवहारावरून वाद सुरू होता.


मिळालेल्या माहितीनुसार,सन 2019 मध्ये सचिनने महेश बुरांडे याला सुमारे सव्वा लाख रुपये फर्निचर बनवण्यासाठी दिले होते.महेशने ना फर्निचर तयार करून दिले,ना पैसे परत केले. त्यामुळे दोघांमध्ये वारंवार वाद होत होते.आज महेश ने सचिनला लांजेडा वार्डातील आपल्या घरी, जिथे तो फर्निचर बनवण्याचे काम करतो,तिथे बोलावले होते.सचिन हा आपल्या परिचित दीपक नंदेश्वर याच्यासोबत त्या ठिकाणी गेला. यावेळी दोघांमध्ये तीव्र बाचाबाची झाली.


पोलीस तपासात असे समोर आले आहे की,आरोपी महेश बुरांडे याने हल्ल्याची पूर्वतयारी करून ठेवली होती.बाचाबाची दरम्यान त्याने घराच्या आतून मिरची पावडर आणून अचानक सचिन आणि प्रत्यक्षदर्शी दीपक नंदेश्वर यांच्या अंगावर फेकली. त्यामुळे दोघे काही काळ गोंधळलेल्या अवस्थेत असताना महेशने संधी साधत फर्निचर बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या धारदार अवजाराने सचिनवर वार केले.


या हल्ल्यात सचिन गंभीर जखमी झाला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.या घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार दीपक नंदेश्वर असून तो घटनेच्या वेळी सचिनसोबत उपस्थित होता.प्राथमिक माहितीनुसार, पैशांच्या देवाण - घेवाणीवरील वादातून हा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. घटना घडताच आरोपी महेश बुरांडे हा घटनास्थळावरून फरार झाला आहे.


घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !