मोहर्ली - पद्मापूर मार्गावरील व्हायरल व्हिडिओ प्रकरणी वनगुन्हा दाखल ; आरोपींचा शोध सुरू.

मोहर्ली - पद्मापूर मार्गावरील व्हायरल व्हिडिओ प्रकरणी वनगुन्हा दाखल ; आरोपींचा शोध सुरू.


एस.के.24 तास 


चंद्रपूर :- मोहर्ली पद्मापूर मार्गावर वाघाचा रस्ता अडवून त्याचा पाठलाग करत व्हिडिओ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या प्रकरणी वनविभागाने संबंधितांविरुद्ध वनगुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपींचा शोध सुरू असून त्यांच्यावर न्यायालयीन कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.

         

१५ मार्च रोजी मोहर्ली पद्मापूर मार्गावर काही नागरिकांनी व पर्यटकांनी आपली वाहने रस्त्यावर थांबवून वाघाचा व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली. यावेळी काही जण रस्त्याच्या खाली उतरून वाघाचा रस्ता अडवत त्याचा पाठलाग करत व्हिडिओ काढत असल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. या प्रकारामुळे वन्यजीवांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. 


या घटनेची दखल घेत वनविभागाने तातडीने चौकशी सुरू केली आहे. वाघाच्या भ्रमणमार्गावर वाहने थांबवून अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचेही विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच रस्त्याच्या खाली उतरून वाघाचा पाठलाग करणाऱ्या आरोपीविरुद्ध वनगुन्हा क्रमांक ०९६५४/२११३३३, आज १५ मार्च २०२६ रोजी भारतीय वन अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

        

या प्रकरणातील आरोपींची ओळख पटवून त्यांच्यावर न्यायालयीन कार्यवाही करण्यात येणार असून सदर वनगुन्ह्याची चौकशी मोहर्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे करीत आहेत. दरम्यान, व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तींची ओळख पटल्यास नागरिकांनी ९८३४६८९५४१ या क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे. 


तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी नागरिकांनी वन्यजीवांच्या भ्रमणमार्गात अडथळे निर्माण करू नयेत व वन्यजीवांचे संरक्षण करण्यास सहकार्य करावे, असे आवाहनही वनविभागाकडून करण्यात आले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !