महाराष्ट्रातील या वर्षातला वणव्याने घेतला पहिला बळी ; आठ दिवसांच्या झुंझीनंतर वनपालाचा मृत्यू ; वनविभागाच्या ढिसाळ कारभारावर आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह. 📍आग विझवण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेला " ब्लोअर पंप " नव्हता,स्थानिक वनपरिक्षेत्र अधिकारी घटनास्थळी अनुउपस्थित.


महाराष्ट्रातील या वर्षातला वणव्याने घेतला पहिला बळी ; आठ दिवसांच्या झुंझीनंतर वनपालाचा मृत्यू ; वनविभागाच्या ढिसाळ कारभारावर आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह.


📍आग विझवण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेला " ब्लोअर पंप " नव्हता,स्थानिक वनपरिक्षेत्र अधिकारी घटनास्थळी अनुउपस्थित.


एस.के.24 तास 


यवतमाळ : महाराष्ट्रात उन्हाळ्याची चाहूल लागताच जंगलांना वणवे लागण्याचे सत्र सुरू झाले आहे. याच वणव्याने या वर्षीचा पहिला बळी घेतला आहे.यवतमाळ जिल्ह्यातील हिवरी - मनपूर क्षेत्रात लागलेली आग विझवताना गंभीररीत्या भाजलेले धाडसी वनपाल विजय रामदास सिंगनजुडे वय,47 वर्ष रा.गांधीनगर, पुसद जिल्हा.यवतमाळ यांचे शनिवारी छत्रपती संभाजीनगर येथे उपचारादरम्यान निधन झाले.या घटनेमुळे वनविभागाच्या कारभारावर आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

शनिवार 07 मार्च रोजी यवतमाळ नजीक मनपूर च्या जंगलात भीषण वणवा पेटला होता. कर्तव्यदक्ष वनपाल विजय सिंगनजुडे आपल्या पथकासह तिथे पोहोचले.जंगलात 4 ठिकाणी आग लागल्याने पथक विभागले गेले.आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे सिंगनजुडे चहुबाजूंनी आगीच्या ज्वाळांमध्ये अडकले.

जीव वाचवण्यासाठी त्यांनी झाडाचा आसरा घेतला 60 टक्क्यांहून अधिक भाजल्याने त्यांची प्रकृती खालावली. यवतमाळ येथून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले होते,जिथे आठ दिवसांच्या झुंझीनंतर शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली.विजय सिंगनजुडे यांच्यापश्चात वृद्ध आई, पत्नी,मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. 

वणवा विझवण्यासाठी वन विभागातील कर्मचाऱ्यांना सर्व साधनसामग्री दिली जात असल्याचे वरिष्ठ अधिकारी सांगतात.  वस्तुस्थिती वेगळी असल्याचे या घटनेनंतर समोर आले आहे. घटनेच्या वेळी कर्मचाऱ्यांकडे आग विझवण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेला " ब्लोअर पंप " उपलब्ध नव्हता,अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

वणवा विझवताना नेमकी काय काळजी घ्यावी, वारा कोणत्या दिशेला आहे आणि बचावाचे मार्ग कोणते, याचे कोणतेही तांत्रिक प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना दिले जात नसल्याचा आरोप आता वन कर्मचाऱ्यांनी केला आहे.शनिवारी ही घटना घडली तेव्हा स्थानिक वनपरिक्षेत्र अधिकारी घटनास्थळी उपस्थित नव्हते. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे प्रामाणिक कर्मचाऱ्याचा नाहक बळी गेल्याचा आरोप वनवर्तुळात व्यक्त होत आहे.

वन विभागात वणवा विझवताना विजय सिंगनजुडे यांचा झालेला हा या वर्षातील राज्यातील पहिला मृत्यू आहे.या पूर्वीही तीन,चार वर्षांपूर्वी नागझिरा अभयारण्यात वणवा विझवताना याच प्रकारे दोन वन कर्मचारी भाजले होते. 

दरवर्षी उन्हाळ्यात अशा घटना घडत असल्याने वन कर्मचाऱ्यांनी प्राण गमावले आहेत,तरीही प्रशासनाला जाग आलेली नाही.आणखी किती कर्मचाऱ्यांचा जीव गेल्यावर  वन विभाग साधनं पुरविणार आणि प्रशिक्षण देणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !