जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत पेसा क्षेत्रातील सर्वं कंत्राटी शिक्षकांना सेवेत सामावून घ्यावे,पेसा कंत्राटी शिक्षकांची धरणे आंदोलन
📍जो पर्यंत शिक्षण सेवक पदावर सामावून घेण्याचा निर्णय होत नाही,तोपर्यंत माघार न घेण्याचा निर्धार
एस.के.24 तास
गडचिरोली : (दिनांक,16/03/2026 सोमवार) गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम,नक्षलग्रस्त आणि मागास भागात तुटपुंज्या मानधनावर सेवा देणाऱ्या " पेसा " क्षेत्रातील 440 कंत्राटी शिक्षकांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी एल्गार पुकारला.सोमवार 16 मार्च पासून जिल्हा परिषदे समोर या शिक्षकांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले असून,जो पर्यंत शिक्षण सेवक पदावर सामावून घेण्याचा निर्णय होत नाही,तोपर्यंत माघार न घेण्याचा निर्धार केला आहे.
शासनाच्या आदेशानुसार शैक्षणिक सत्र 2024 - 25 मध्ये जिल्ह्यातील शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी TET/CTET व TAIT - 2022 उत्तीर्ण पात्रताधारकांची पेसा क्षेत्रांतर्गत कंत्राटी तत्त्वावर नियुक्तीकरण्यात आली होती. मागील दोन वर्षापासून हे शिक्षक अतिसंवेदनशील भागात 6 - 6 महिने मानधन प्रलंबित असतानाही प्रामाणिकपणे सेवा देत आहेत.दिनांक,11 फेब्रुवारी 2026 च्या महाराष्ट्र शासन निर्णयानुसार,सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार पेसा क्षेत्रातील 50% टक्के पदे अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवून उर्वरित 50% पदे खुल्या प्रवर्गातून भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तरी दोन वर्षापासून सेवा देणाऱ्या कंत्राटी पेसा शिक्षकांना सामावून घ्यावे, अशी संघटनेची मागणी आहे. शासनाच्या या नवीन पदभरती निर्णयामुळे गेल्या दोन वर्षांपासून सेवेत असलेल्या कंत्राटी शिक्षकांच्या नोकरीवर टांगती तलवार आली आहे. आम्ही उपासमार सोसून दुर्गम भागात काम केले, आता नवीन भरतीमुळे आमच्यावर अन्याय होईल.शासनाने या जागा पोर्टलवर न देता, सध्या कार्यरत असलेल्या पात्र कंत्राटी शिक्षकांनाच शिक्षण सेवक म्हणून कायम करावे,अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
या आंदोलनात पेसा कंत्राटी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अरविंद शेडमाके,सूरज मांदाळे,उपाध्यक्ष सारिका शेडमाके,आनंद लांजेवार,आकाश गुज्जेवार,सुभाष कांबळे,गजानन राऊत,सुशांत भैसारे,जितेंद्र सहारे,यांच्यासह जिल्ह्यातील सर्व 440 कंत्राटी शिक्षक सहभागी झाले आहेत.

