📍गडचिरोली पोलिसांची धडाकेबाज कारवाई.
एस.के.24 तास
गडचिरोली : फर्निचर बनवून देण्याच्या व्यवहारातून गेल्या सहा वर्षांपासून सुरू असलेल्या वादाचे पर्यावसान सोमवारी एका भीषण रक्तरंजित घटनेत झाले. लांझेडा वॉर्डातील एका फर्निचर विक्रेत्याने ग्राहकाच्या डोळ्यात तिखट फेकून त्याच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले.या हल्ल्यात ग्राहकाचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणाला गांभीर्याने घेत गडचिरोली पोलिसांनी अत्यंत कार्यक्षमतेने अवघ्या 20 तासांच्या आत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
महेश महादेव बुरांडे वय,43 वर्ष रा.लांझेडा वॉर्ड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी त्याला चंद्रपूर येथील न्यायालय परिसरातून तांत्रिक माहितीच्या आधारे ताब्यात घेतले.सचिन रामचंद्र कोलूरवार वय,35 वर्ष रा.विवेकानंद नगर) असे या हल्ल्यात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा वाद 2019 - 2020 मधील कोरोना काळापासून सुरू होता.त्यावेळी एका पोलीस अधिकाऱ्याने सागवानाचे फर्निचर बनवण्यासाठी महेश बुरांडे याला 2 लाख रुपये दिले होते.6 वर्षे उलटूनही महेशने काम पूर्ण केले नव्हते.या कामाचा पाठपुरावा करण्यासाठी मृत सचिन कोलूरवार मध्यस्थी करत होता, तसेच सचिनचे स्वतःचेही काही काम महेशकडे प्रलंबित होते.वारंवार सांगूनही काम पूर्ण होत नसल्याने आठ दिवसांपूर्वी सचिनने महेशला कडक शब्दांत तंबी दिली होती.
सोमवारी दुपारी 4:00.च्या सुमारास सचिन पुन्हा कामाचा जाब विचारण्यासाठी महेशच्या लांझेडा वॉर्डातील वर्कशॉपवर गेला.तिथे दोघांमध्ये पुन्हा खडाजंगी झाली.वादाचे रूपांतर हाणामारीत होताच,महेशने पूर्वनियोजित कटानुसार सचिनच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली.सचिनला काहीही सुचायच्या आत महेशने फर्निचर कामासाठी वापरल्या जाणाऱ्या तीक्ष्ण हत्याराने त्याच्या छातीवर वार केले.वर्मी घाव बसल्याने सचिन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा जागीच प्राण गेला.
घटनेनंतर आरोपी महेश फरार झाला होता. पोलिसांनी तात्काळ विशेष पथके तयार करून शोधमोहीम हाती घेतली.आरोपी चामोर्शी तालुक्यातील एका गावात लपल्याची माहिती मिळाली होती.तिथूनही तो पसार झाला.अखेर लोकेशन ट्रॅकिंग आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचे चंद्रपूर येथील लोकेशन निश्चित करण्यात आले.
दबा धरून बसलेल्या पोलिसांनी योग्य संधी साधत आरोपीला अटक केली आणि गडचिरोली येथे आणले.या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.

