विभागीय कार्यालय आलापल्ली येथे शहीद झालेल्या वन कर्मचाऱ्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 11 सप्टेंबरला वन शहीद दिन पाळण्यात आला.
एस.के.24 तास
आलापल्ली : येथील वनविभागाच्या विभागीय कार्यालयाच्या प्रांगणात कर्तव्य करताना शहीद झालेल्या वन कर्मचाऱ्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 11 सप्टेंबरला वन शहीद दिन पाळण्यात आला.
यानिमित्त आयोजित कार्यक्रमात आलापल्ली, भामरागड आणि सिरोंचा विभागाच्या वरिष्ठ वनअधिकाऱ्यांनी शहीद स्मृतिस्थळावर पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली. यानिमित्त वनसंरक्षणाच्या नवीन तंत्रज्ञानावर आणि त्याच्या वापरावर चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले.
वन सुरक्षा कर्मचारी आणि वन्यजीव संरक्षण कार्यकर्त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी हा वनशहीद दिन पाळला जातो. यावेळी वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शहीद कर्मचाऱ्यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून श्रद्धांजली वाहिली.
जंगलांचे रक्षण, वन्यजीव रक्षणासाठी, तसेच वनक्षेत्रातील शांतीसाठी आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ज्या कर्मचाऱ्यांनी आपले प्राण गमावले, त्यांचे योगदान न विसरणे हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता.
आलापल्ली विभागीय कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमात आलापल्ली वनविभागाच्या उपवनसंरक्षक दीपाले तलमले, भामरागड वनविभागाचे उपवनसंरक्षक शैलेश मीना, सिरोंचा वनविभागाचे उपवनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी, तसेच परिविक्षाधीन आयएफएस अधिकारी मोहम्मद आझाद, विष्णू रेड्डी, याशिवाय सहायक वनसंरक्षक पवार, रामटेके, बाळापुरे,वनपरिक्षेत्र अधिकारी गौरव गणवीर (आलापल्ली), नरेश चौके (पेरमिली), नारायण इंगळे (अहेरी), गडमाडे (कमलापूर) हे प्रामुख्याने उपस्थित होते.
स्थानिक ग्रामस्थ आणि वन्यजीव प्रेमींनी या कार्यक्रमात सहभागी होऊन वनक्षेत्रातील शहीदांच्या शौर्याचा गौरव केला. या कार्यक्रमात वनसुरक्षा क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान आणि साधनांचा उपयोग कसा केला जातो, यावरही चर्चा झाली.

