चोरटी गावात सामाजिक बहिष्काराचा विळखा ; ग्रामस्थांची पत्रकार परिषदेत व्यथा.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,१३/०९/२५ चंद्रपूर जिल्ह्यातील चोरटी गावात मोरेश्वर दादाजी उईके या व्यक्तीकडून गावातील लोकांवर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.यामुळे गावातील लोकांना सामाजिक,
आर्थिक आणि व्यावहारिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.या अन्यायातून सुटका मिळावी अशी मागणी करत ग्रामस्थांनी माननीय उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी व माननीय तहसीलदार ब्रम्हपुरी यांना तक्रार अर्ज दिलेला आहे.याविषयी ग्रामस्थानी पत्रकार परिषदेत आपली कैफियत मांडली आहे.
चोरटी गावातील उद्धव खटुजी कोरवाते यांना मोरेश्वर दादाजी उईके यांनी त्याच्या समाजातून सामाजिक बहिष्कृत केले आहे. हा बहिष्कार केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित नसून, गावातील इतर लोकांसाठीही अनधिकृत नियम बनवण्यात आले आहेत.मोरेश्वर उईके यांनी असा अलिखित नियम केला आहे की,जर त्याच्या समाजातून कोणीही उद्धव खटुजी कोरवाते यांच्याशी व्यावहारिक व इतर संबंध ठेवल्यास किंवा सामूहिक वनहक्कच्या रोजगार हमी योजनेच्या कामावर गेले तर त्यांना २००० रुपये प्रति व्यक्ती दंड आकारला जाईल आणि त्यांना समाजातून बाहेर काढले जाईल.
यामुळे गावात सामाजिक विषमता पसरलेली आहे .अमानवीय व संविधान विरोधी कृत्याला विरोध केला तर सदर व्यक्ती गावगुंडांना हाताशी धरून गुंडागर्दी करून हाणामारी करतो. या प्रकारामुळे गावातील लोकांना मोरेश्वर दादाजी उईके च्या आतंकाला बळी पडून भीतीच्या सावटा खाली जगणे असह्य झाले आहे.या बहिष्काराच्या नियमामुळे भीतीने गावातील लोकांना रोजगार हमी योजनेच्या कामावर जाणे शक्य होत नाही.
इतकंच नाही तर गावातील मोरेश्वर दादाजी उईके त्याच्या समाजातून कोनताही व्यक्ती इतर समाजातील लोकांच्या कामावर गेल्यासही सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागत आहे. यामुळे गावातील लोकांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.त्यांना रोजगार मिळत नाही आणि समाजात वावरणेही कठीण झाले आहे.ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा, २०१६ (Social Boycott Prevention Act, 2016) याचे स्पष्ट उल्लंघन आहे.
चोरटी गावातील ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची आणि या अन्यायी बहिष्काराच्या विळख्यातून आपली सुटका करण्याची मागणी केली आहे.त्यांनी प्रशासनाला आवाहन केले आहे की,या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून दोषींवर कठोर कारवाई करावी जेणेकरून गावातील लोकांना त्यांचे हक्क आणि सन्मान परत मिळवता येईल.
सदर प्रकरणाची माहिती स्थानिक पोलीस आणि प्रशासनाकडे पोहोचल्यानंतर यावर काय कारवाई होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. समाजातील प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे आणि अशा प्रकारच्या अन्यायाला कायद्यानुसार आळा घालणे आवश्यक आहे.



