धान वाढीच्या वेळेतच मुल - सावली तालुक्यात युरियाचा खताचा तुटवडा ; मुल - सावली तालुक्यातील शेतकरी संकटात. 📍पावसाने दिली साथ,पण खताचा तुटवड्याने शेतकरी संकटात,खत त्वरित उपलब्ध करून द्यावे. - संतोषसिंह रावत

धान वाढीच्या वेळेतच मुल - सावली तालुक्यात युरियाचा खताचा तुटवडा ; मुल - सावली तालुक्यातील शेतकरी संकटात.


📍पावसाने दिली साथ,पण खताचा तुटवड्याने शेतकरी संकटात,खत त्वरित उपलब्ध करून द्यावे. - संतोषसिंह रावत


राजेंद्र वाढई - उपसंपादक


मुल : मुल - सावली तालुक्यात शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती असून रोजगाराचे पर्यायी साधन नसल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी कृषीवर अवलंबून आहेत. रोवणी आटोपल्याला महिनाभराचा कालावधी लोटत असून सद्यस्थितीत शेतकऱ्यांना युरिया खताची गरज आहे मात्र तालुक्यात कोणत्याही कृषी केंद्रावर युरिया उपलब्ध नसल्याने शेतकरी हैराण झाल्याचे चित्र आहे. 


मुल तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात तालुक्यात तब्बल २६ हजार हेक्टरवर पेरणी झाली असून त्यापैकी २४ हजार १०० हेक्टरवर भात लागवड करण्यात आली आहे. तसेच सावली तालुक्यात सुद्धा ३० हजार हेक्टर धानाची लागवड केली आहे.दोन्ही तालुक्यात भात हे तालुक्यातील मुख्य पीक असल्याने या पिकावर हजारो शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे.


पावसाने दिली साथ,पण खताचा तुटवडा आडवा.

हंगामाच्या सुरुवातीला पावसाने दगा दिल्याने रोवणी उशिरा झाली. मात्र मागील महिनाभरात पावसाने दिलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद परतला होता. सध्या धानपिके भरभराटीला आली असून वाढीसाठी मोठ्या प्रमाणात युरियाची आवश्यकता आहे. पण याच टप्प्यावर तालुक्यात युरियाचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला आहे.


खत केंद्रांवर शेतकऱ्यांच्या चकरा

तालुक्यातील विविध खत विक्री केंद्रांवर शेतकऱ्यांना हेलपाटे  मारावे लागत आहे. परंतु गरजू  शेतकऱ्यांना अपेक्षित प्रमाणात खत मिळत नसल्याने अनेकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. शेतकरी गावोगावी भटकंती करत असून आज मिळेल की नाही या विवंचनेत दिवस जात आहेत.


तातडीने पुरवठ्याची मागणी : - 


शेतकऱ्यांच्या या त्रासामुळे संतापाचे वातावरण तयार झाले असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी होत आहे. खत पुरवठा सुरळीत न झाल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होईलच, पण याचा थेट परिणाम तांदळाच्या उत्पादनावर होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. जर येत्या तीन दिवसात युरिया खत शेतकऱ्यांना उपलब्ध झाला नाही तर कृषी कार्यालयावर आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा माजी जी.प.अध्यक्ष तथा प्रदेश काँग्रेसचे महासचिव संतोषसिंह रावत यांनी दिला आहे.


धानपिकाच्या वाढीच्या या टप्प्यावर युरिया खत फार महत्वाचे आहे. पण खत मिळत नसल्याने शेतकऱ्यांना खूप धावपळ करावी लागत आहे. वेळेवर खत न टाकल्यास उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. शासनाने तातडीने पुरवठा करावा. - युवराज चौधरी,शेतकरी चिमढा


महत्वाचे म्हणजे धान पिकाची वाढ होण्याची वेळ आली असताना मूल सावली तालुक्यातच युरिया शासनाकडून पुरवठा होत नाही ही मोठी शोकांतिका आहे.धान वाढीची वेळ निघून गेल्यावर खत मिळेल तर उपयोग काय. याची शासनाने तात्काळ दखल घेऊन त्वरित खत उपलब्ध करुन द्यावे. - सुजित दंडावार,शेतकरी खेडी


युरिया खताची मागणी प्रशासनाकडे केली आहे. लवकरच युरिया खत उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांनी संयम बाळगावा. - सुनील कारडवार,तालुका कृषी अधिकारी मुल

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !