मार्कंडा यात्रेत वैनगंगा नदीत बुडणाऱ्यांची मोठी दुर्घटना टळली.
पोलीस व आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या तत्परतेमुळे वाचले 3 युवकांचे प्राण...!
एस.के.24 तास
चामोर्शी : तालुक्यातील मार्कंडा यात्रेदरम्यान आज सायंकाळी वैनगंगा नदीत बुडण्याची घटना घडली.पोलिस व आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या तत्परतेमुळे तिन्ही युवकांचे प्राण वाचल्याने मोठी दुर्घटना टळली. मिळालेल्या माहितीनुसार, सुमित शेंडे वय,16 वर्ष रा.मुल जि.चंद्रपूर हा आपल्या मित्रांसोबत मार्कंडा यात्रा येथे फिरण्यासाठी आला होता. सायंकाळी सुमारे 4:00.वा.च्या सुमारास तो वैनगंगा नदीच्या पात्रात अंघोळीसाठी उतरला.
पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. त्याला वाचविण्यासाठी त्याचे दोन मित्र नदीत उतरले; मात्र त्यांनाही नीट पोहता येत नसल्याने ते देखील पाण्यात अडचणीत सापडले.घटनेची माहिती मिळताच बंदोबस्तावर असलेल्या पोलिस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स.पो.नि. सोनुले (गडचिरोली),पो.उप नि.जाधव (पेंढरी),पो.उप नि. कोळी (गडचिरोली) तसेच तीन अंमलदार यांनी त्वरित बचावकार्य सुरू केले.
जिल्हा पोलीस दलातील प्रशिक्षित स्विमर पो.कॉ. ५५६७ बाबासाहेब विलास वासनिक व पो.कॉ.६१०१ गोपाळ हणमंय्या आलाम यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाच्या मदतीने तिन्ही युवकांना नदीतून सुरक्षित बाहेर काढले. यानंतर तिन्ही युवकांना तातडीने प्राथमिक उपचार देण्यात आले.
सुदैवाने तिघांचीही प्रकृती स्थिर असून ते सध्या सुस्थितीत आहेत. पोलिसांच्या समयसूचकतेमुळे व धाडसी प्रयत्नांमुळे मोठी जीवितहानी टळल्याबद्दल उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

