भरधाव ट्रकची ट्रॅक्टरला जबर धडक 2 ठार तर 3 गंभीर...!
एस.के.24 तास
कोरची : तालुका मुख्यालयापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर कोरची-मोहगाव मार्गावर भरधाव ट्रकने ट्रॅक्टरला मागून दिलेल्या जबर धडकेत दोन कामगारांचा मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत.प्राप्त माहितीनुसार, झेंडेपार येथील बंधाऱ्याच्या कामासाठी लोखंडी साहित्य घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला हैदराबादहून रायपूरकडे दगडांची चुरी घेऊन जाणाऱ्या CG.07.BA 9284 क्रमांकाच्या ट्रकने जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की सागर कल्लो वय,20 वर्ष रा. चांदागड यांचा जागीच मृत्यू झाला,तर कैलास कोवे वय,35 वर्ष रा.वाकडी यांचा रुग्णालयात नेत असताना वाटेत मृत्यू झाला. तर प्रदीप नैताम वय,24 वर्ष रा.चीचटोला व राजेश गंगाभोईर वय,28 वर्ष रा.चिंचगाव) यांचे हात फॅक्चर झाले असून ट्रॅक्टर चालक पुरुषोत्तम मडकाम वय,51 वर्ष हे गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातानंतर 108 रुग्णवाहिकेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र संपर्क होऊ न शकल्याने जखमींना पोलिसांच्या मदतीने खाजगी वाहनातून ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे हलविण्यात आले आहे.
अपघातानंतर ट्रक चालक अभिषेक शर्मा वय,30 वर्ष रा. चितवाडा,जि.बालिया उत्तरप्रदेश) हा घटनास्थळावरून पसार होण्याच्या प्रयत्नात होता.पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी करून तपासणी नाक्यावर संशयित ट्रक अडवला आणि चालकाला ताब्यात घेण्यात यश मिळवले.या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

