आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई यांचा सुदर्शनजी निमकर यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
राजुरा : स्वच्छ, सुंदर, निर्मळ आणि पर्यावरणपूरक मॉडर्न स्मार्ट ग्राम म्हणून लौकिक मिळवलेल्या कळमना गावाचे आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई यांचा सत्कार माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा इतर मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष, भारत सरकार हंसराज भैय्या अहिर यांच्या हस्ते करण्यात आला. हा कार्यक्रम माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आदरणीय सुदर्शनजी निमकर यांच्या वाढदिवसानिमित्त सुदर्शनजी निमकर मित्र मंडळ व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला.
कळमना हे गाव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व महात्मा गांधी यांच्या गावाकडे चला या ब्रीदवाक्याचे प्रत्यक्ष उदाहरण ठरले आहे.सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे गावाने शाश्वत विकास साधला आहे. याच कामगिरीच्या जोरावर कळमना गावाला आर.आर. आबा पाटील सुंदर गाव योजना अंतर्गत जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.
कार्यक्रमात सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सरपंच वाढई यांचा गौरव करण्यात आला. या वेळी आपली भावना व्यक्त करताना सरपंच वाढई म्हणाले, अनेकदा लोकप्रतिनिधी गाव पातळीवरील कामांचे कौतुक करत नाहीत. मात्र, सुदर्शनजी निमकर साहेबांनी माझ्यासारख्या खेड्यातील सरपंचाचा सत्कार करून मला खऱ्या अर्थाने आशीर्वाद दिला आहे. हा सन्मान माझ्या कार्याला नवचैतन्य देणारा असून मी गावकऱ्यांची सेवा करण्यास अधिक तत्पर राहीन.
या प्रसंगी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज भैय्या अहिर, माजी आमदार सुदर्शनजी निमकर, माजी आमदार संजय धोटे, वर्षाताई निमकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रविंद्रजी शिंदे, संचालक विजयराव बावणे, अविनाश जाधव, माजी जिल्हा अध्यक्ष केशवराव ठाकरे, निलेश ताजने, अरुणभाऊ मस्की, केंदे साहेब, शिवाजी सोलेकर, उपसभापती संजय पावडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप बोबडे यांनी केले तर आभार प्रदर्शन मनोज पावडे यांनी मानले.

