मुल तालुक्यातील जुनासुर्ला येथे हायटेंशन वायर च्या धक्क्याने दोन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू.
सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक
मुल : मुल तालुक्यातील जुनासुर्ला येथे आज सकाळी 9:30 वा.च्या सुमारास घडलेल्या एका भीषण अपघातात दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला.स्लॅब टाकण्याच्या कामादरम्यान झालेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हरिदास शशिकांत चुदरी वय,37 वर्ष रा.नवेगाव भुजला,ता.मुल,विनोद मुकुंदा बोरकुटे वय,40 वर्ष रा.नवेगाव भुजला,ता. मुल असे मृतकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जुनासुर्ला गावात घर बांधकामासाठी लोखंडी रॉड उभारत असताना तो थेट वरून गेलेल्या हायटेंशन वायरीच्या संपर्कात आला. त्यामुळे जोरदार विद्युत प्रवाह मजुरांना लागला आणि दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
घटनास्थळी तातडीने ग्रामस्थांनी धाव घेतली, मात्र तोपर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मुल पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले.या अपघातामुळे दोन्ही मजुरांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रोजंदारीवर काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबांचा कर्ता पुरुष अचानक हरपल्याने गावात शोककळा पसरली आहे.
स्थानिक नागरिकांनी अशा अपघातांना आळा घालण्यासाठी बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षा उपाययोजना काटेकोरपणे करण्याची मागणी केली आहे.या घटनेची नोंद मुल पोलिस ठाण्यात करण्यात आली असून प्राथमिक तपास पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा राष्ट्रपाल काटकर यांनी केले.

