माओवाद्यांनी घातपाताच्या उद्देशाने लपवून ठेवलेले जुने स्फोटक साहित्य गडचिरोली पोलीस दलाने केले हस्तगत.
एस.के.24 तास
कोरची : दि.१७/०९/२०२५ गडचिरोली जिल्ह्यात माओवायांकडून शासनविरोधी घातपाताच्या कारवाया करुन सुरक्षा दलांना हानी पोहचविण्यासाठी विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहित्यांचा वापर केला जातो. या प्रकारचे साहित्य माओवाद्यांकडून वेगवेगळ्या ठिकाणी जंगल परिसरात जमिनीमध्ये पूरुन ठेवले जात असते. अशा पूरुन ठेवलेल्या साहित्याचा वापर माओवायांकडून विध्वंसक कारवायांसाठी केला जातो.गडचिरोली पोलीस दलाने अशाच प्रकारचे माओवाद्यांचे जुने लपवून ठेवलेले स्फोटक साहित्य अभियान दरम्यान जप्त केलेले आहे.
सविस्तर वृत्त असे आहे की,गोपनिय बातमीदार कडून वरिष्ठांना खात्रीशीर माहिती प्राप्त झाली होती की,पोस्टे कोरची हद्दीतील मौजा,लेकुरबोडी जंगल परिसरात माओवाद्यांकडून पोलीस पथकास घातपात करण्याच्या उद्देशाने मागील वर्षापासून स्फोटक पदार्थ व साहित्य लपवून ठेवण्यात आलेले आहे, अशा मिळालेल्या विश्वसनीय गोपनीय माहिती वरून दि.१५/०९/२०२५ रोजी पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली सदर स्फोटकांचा शोध घेणे करीता योग्य योजना आखून मौजा लेकुरबोडी जंगल परिसरात विशेष अभियान पथकाची तीन पथके व बिडीडीएसचे एक पथक माओवादविरोधी अभियान राबविणेकामी रवाना करण्यात आले.
काल दिनांक १६/०९/२०२५ रोजी सदर जंगल परिसरात पायी शोध अभियान राबवित असताना पोलीस पथकास मौजा लेकुरबोडी जंगल परिसरात एक संशयीत ठिकाण मिळून आले. यावरुन बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून सदर ठिकाणाची तपासणी केली असता, त्याठिकाणी माओवाद्यांकडून लपवून ठेवलेला ०१ नग ०५ लिटरचा स्टिलचा डब्बा,१.२५ किलो पांढरी स्फोटक पावडर, २.५० किलो धार लावलेले लोखंडी सिंलटर, ०४ नग क्लेमोर व ०८ नग इलेक्ट्रीक वायर बंडल मिळून आले.
सुरक्षिततेची योग्य काळजी घेत पोलीस पथकाकडून घटनास्थळावर मिळून आलेले सर्व स्फोटक साहित्य जप्त करण्यात आले आहे. गडचिरोली पोलीसांच्या सतर्कतेमुळे माओवाद्यांनी लपवून ठेवलेले वरील प्रमाणे मोठे साहित्य जप्त करण्यामध्ये गडचिरोली पोलीस दलास यश प्राप्त झाले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. सत्य साई कार्तिक, पोलीस उप-अधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोजे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, कुरखेडा
श्री.रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली विअप गडचिरोलीचे पोउपनि. प्रसाद पवार, पोउपनि. निखिल धोबे, बिडीडीएस गडचिरोलीचे पोउपनि. गणेश वलमर-पाटील सोबतच विशेष अभियान पथक व बीडीडीएस पथकाच्या जवानांनी यशस्वीरित्या पार पाडली.
पोलीस अधीक्षक,गडचिरोली श्री.नीलोत्पल यांनी या कार्यवाहीत सहभागी अधिकारी व जवानांचे कौतुक केले आहे.तसेच सदर जंगल परिसरात माओवादविरोधी अभियान आणखी तीव्र करण्यात आले असून, पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी माओवाद्यांना माओवादाची हिंसक वाट सोडून आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.