गडचिरोली पासून 287 कि. मी.सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम पात्तागुडम पोलिस स्टेशन मध्ये पोलिसांची अनोखी दिवाळी साजरी.
सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक एस.के.24 तास
सिरोंचा : पातागुडम हे गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात एक गाव आहे. हे गाव जिल्ह्याच्या ठिकाणा पासून सुमारे 287 कि.मी अंतरावर आहे आणि त्याची ओळख आदिवासी बहुल,संवेदनशील आणि घनदाट जंगल परिसर आहे.गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम आणि संवेदनशील भागात वसलेले पात्तागुडम पोलिस स्टेशन असून येथे दिवसेंदिवस जंगलाचा शांतपणा,रात्रीची अनिश्चितता आणि धोका हेच वास्तव आहे.
पण त्या अंधारातही काहीजण दिव्यांचा प्रकाश जिवंत ठेवतात,ते म्हणजे आपले पोलिस जवान.यावर्षी पात्तागुडम पोलिसांनी एक वेगळी दिवाळी साजरी केली.परिवारांपासून दूर, गावकर्यांच्या सुरक्षेसाठी दिवस - रात्र सजग राहणारे हे जवान सणाचा आनंद स्वतःपुरता न ठेवता,तो आनंद जनतेसोबत वाटून घेतले.पोलिस अधिकारी धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पात्तागुडम ठाण्यात दिवाळीचा उत्सव साजरा करण्यात आला.
जवानांनी दिवे लावले, मिठाई वाटली आणि स्थानिक नागरिकांसोबत संवाद साधत त्यांच्यात विश्वासाचा दीप प्रज्वलित केला.या ठिकाणी दिवाळी म्हणजे फटाके नव्हे,तर कर्तव्याचा प्रकाश. येथील प्रत्येक जवान आपल्या घरापासून, परिवारापासून,लहान मुलांपासून दूर राहतो.
पण त्यांच्या चेहर्यावर तक्रार नसते,असते फक्त समाधानाची झलक.कारण त्यांना ठाऊक आहे.पोलिस जवानाच्या जागरणामुळे गाव बिनधास्त झोपू शकते.अशा परिस्थितीत साजरी झालेली ही दिवाळी केवळ सण नाही,तर मानवतेचा उत्सव ठरली.
गावकर्यांनी आणि पोलिसांनी एकत्र येऊन केलेला हा आनंदोत्सव म्हणजे विश्वासाचा सेतू बांधणारा क्षण आहे.जो दाखवतो की,सुरक्षा ही केवळ शस्त्रात नसते,ती माणसांच्या नात्यांमध्येही असते. अधिकारी धोत्रे हे केवळ ठाणे चालवत नाहीत. तर आपल्या जवानांमध्ये आणि जनतेमध्ये विश्वास आणि प्रेरणेची ज्योत पेटवत आहेत.
पात्तागुडम मधील ही दिवाळी आपल्याला एकच गोष्ट शिकवते.ती म्हणजे अंधार कुठलाही असो,जर कर्तव्य आणि माणुसकीचा दिवा पेटला तर प्रकाश आपोआप पसरतो.