संजय गांधी निराधार योजनेतील थकीत अनुदान तत्काळ वाटप करा. - रोहित कामडे यांचे ना.इंद्रनिल नाईक यांना निवेदन.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
मुल : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दिव्यांग सेलतर्फे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जिल्ह्यातील अपंग बांधवांना थकीत अनुदान तत्काळ वितरित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भातील निवेदन दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष रोहित कामडे यांनी राज्याचे राज्यमंत्री (उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद व जलसंधारण) ना. इंद्रनिल नाईक यांना दिले.
कामडे यांनी निवेदनात नमूद केले आहे की, संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील अपंग बांधवांचे अनुदान गेल्या काही काळापासून थकीत आहे. या विलंबामुळे अनेक अपंग आणि त्यांच्या कुटुंबियांना अत्यावश्यक गरजा भागविण्यास अडचणी येत आहेत. थकीत अनुदान वितरणात झालेल्या विलंबाचा थेट परिणाम त्यांच्या जीवनमानावर होत असून अपेक्षित सुधारणा साध्य होत नाही.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अपंग बांधवांना त्यांच्या हक्काचे अनुदान मिळाल्यास त्यांच्या जगण्यातील अडचणी काही प्रमाणात दूर होतील,असेही कामडे यांनी नमूद केले आहे.त्यामुळे राज्य सरकारने या प्रकरणी त्वरीत आणि प्रभावी उपाययोजना करून थकीत अनुदानाचे वितरण करावे, अशी मागणी दिव्यांग सेलतर्फे करण्यात आली आहे.
या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनाही संदर्भासाठी पाठविण्यात आली आहे.