वरोरा शहराजवळील वर्धा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या 4 मुलांपैकी 2 मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू.
📍वरोरा शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.मृत मुलांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
एस.के.24 तास
वरोरा : वरोरा शहराजवळील वर्धा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या चार मुलांपैकी दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी घडली. या घटनेत दोन मुलांना वाचवण्यात यश आले असून मृत मुलांच्या शोधासाठी बचाव पथकाचे प्रयत्न सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार,वरोरा शहरातील कर्मवीर वॉर्ड परिसरातील रुपेश विजेंद्र कुळसंगे वय,१३ वर्ष आणि प्रणय विनोद भोयर वय,१५ वर्ष ही दोन्ही मुले आपल्या दोन मित्रांसह सायकलने वरोरा शहरातून वर्धा नदीच्या तुराणा घाट परिसरात पोहण्यासाठी गेली होती. नदीपात्रात खोल पाणी असल्याने चारही मित्र पोहत असताना अचानक खोल भागात गेले आणि बुडू लागले.
या संकटाचा आवाज जवळच असलेल्या एका गुराख्याने ऐकला.त्याने तातडीने बचावकार्य सुरू करून उमंग धर्मेंद्र आत्राम आणि कृष्णा चंद्रकांत कुईजडे या दोन मुलांना सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणले. मात्र, रुपेश कुळसंगे आणि प्रणय भोयर या दोघांना वाचवण्यात अपयश आले. दोघेही खोल पाण्यात वाहून गेले.
घटनेची माहिती मिळताच चंद्रपूर येथील पोलीस बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून मृत मुलांच्या शोधासाठी नदीपात्रात तीव्र शोधमोहीम सुरू आहे. या घटनेमुळे वरोरा शहरात आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत मुलांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.या घटनेने नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून प्रशासनाने नदीकाठी पोहण्यास जाणाऱ्या नागरिकांना विशेष दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.

