रानटी हत्तींचा कळप आता थेट गडचिरोली जिल्हा शहराजवळ धडकला. 📍वनविभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला रात्री च्या वेळी अनावश्यक बाहेर न पडण्याचे आवाहन.

रानटी हत्तींचा कळप आता थेट गडचिरोली जिल्हा शहराजवळ धडकला.


📍वनविभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला रात्री च्या वेळी अनावश्यक बाहेर न पडण्याचे आवाहन.


एस.के.24 तास


गडचिरोली : गेल्या काही दिवसांपासून चुरचुरा जंगल परिसरात वावरत असलेला रानटी हत्तींचा कळप आता थेट गडचिरोली जिल्हा मुख्यालयाच्या येऊन धडकला आहे.मध्यरात्री या कळपाने मुख्यालयापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावरील माडेतुकूम,आणि अडपल्ली गोगाव,महादवाडी,कुऱ्हाडी चांदाळा परिसरात प्रवेश करून धुमाकूळ घातला. 


या हत्तींनी शेतातील उभ्या धान पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केल्याने ऐन कापणीच्या हंगामात शेतकऱ्यांवर पुन्हा संकट कोसळले आहे.

या घटनेची माहिती मिळताच गडचिरोलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी बालाजी भांडेकर यांच्या नेतृत्वात वनविभागाचे पथक सकाळीच घटनास्थळी दाखल झाले असून,नुकसानग्रस्त भागाची पाहणी आणि पंचनामे करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

वनविभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून, हत्तींच्या जवळ न जाणे, त्यांचे व्हिडिओ किंवा सेल्फी काढण्याचा प्रयत्न न करणे आणि विशेषतः रात्रीच्या वेळी अनावश्यक बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तींचा हा वावर आता नित्याचाच झाला आहे. हा रानटी हत्तींचा कळप मूळ ओडिशा राज्यातील असून, तेथील खाणकामामुळे अधिवास बाधित झाल्याने ते स्थलांतरित झाले.ऑक्टोबर २०२१ मध्ये छत्तीसगडमार्गे या कळपाने प्रथमच गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात प्रवेश केला होता. 

तेव्हापासून हा सुमारे ३५ हत्तींचा कळप गडचिरोली, धानोरा, आरमोरी, कुरखेडा आणि देसाईगंज या तालुक्यांमध्ये अन्न आणि पाण्याच्या शोधात सातत्याने धुमाकूळ घालत असतो. कळप ज्या शेतात शिरतो, तेथील संपूर्ण पीक उद्ध्वस्त होते. प्रामुख्याने धान, तूर आणि मका पिकांना याचा मोठा फटका बसत आहे.

शेतकऱ्यांच्या मते होणारे नुकसान आणि मिळणारी शासकीय मदत यात मोठी तफावत आहे. वनविभागाकडून पंचनामे होतात पण मदत तुटपुंजी आणि विलंबाने मिळत असल्याची तक्रार सातत्याने केली जात आहे. सुरुवातीला केवळ जंगलाला लागून असलेल्या ग्रामीण भागात आणि शेतांमध्ये दिसणारे हे हत्ती आता मानवी वस्तीत आणि शहरांच्या हद्दीतही प्रवेश करू लागले आहेत. 

यापूर्वी मे २०२५ मध्ये देखील,या हत्तींनी थेट गडचिरोली शहरात मध्यरात्री प्रवेश करून मुक्त संचार केला होता. ज्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते. आता पुन्हा १० ते १२ हत्तींच्या काळप शहराच्या सीमेवर येऊन ठेपल्याने वन विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !