गडचिरोली जिल्ह्यात १५ दिवस जमावबंदी.
एस.के.24 तास
गडचिरोली : दिनांक,5 नोव्हेंबर 2025 जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) आणि (३) अन्वये जिल्हाभर १५ दिवसांसाठी जमावबंदी आदेश जारी केला आहे. हा आदेश दिनांक ०७ नोव्हेंबर २०२५ रोजी मध्यरात्रीपासून ते २१ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री २४.०० वाजेपर्यंत लागू राहील.
विविध राजकीय पक्ष,सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सभा,मोर्चे,आंदोलने, मिरवणुका किंवा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित होण्याची शक्यता असल्याने या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी हा आदेश जारी करण्यात आला आहे.
या कालावधीत कोणालाही शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यास उपयोगी पडतील अशा वस्तू बरोबर बाळगण्यास सक्त मनाई आहे. तसेच दाहक किंवा स्फोटक पदार्थ, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे बरोबर ठेवणे, तयार करणे किंवा जमा करणे यावरही बंदी घालण्यात आली आहे.
तसेच या आदेशान्वये कोणालाही उत्तेजक घोषणाबाजी,आवेशपूर्ण भाषणे, अनुचित हावभाव, अश्लील गाणी किंवा सभ्यता आणि नीतिमत्तेला धक्का पोहोचवणारे वर्तन करण्यास मनाई आहे. राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा लोकांमध्ये असंतोष निर्माण होईल, अशा प्रकारचे फलक, चित्रफीत, चिन्हे, प्रतिमा किंवा प्रतीकांचे प्रदर्शन किंवा प्रसारण करणेही प्रतिबंधित आहे.
उपविभागीय दंडाधिकारी,कार्यकारी दंडाधिकारी अथवा संबंधित पोलीस स्टेशन अधिकारी यांच्या पूर्व परवानगीशिवाय कोणीही मिरवणूक काढू शकणार नाही. तसेच पाच किंवा त्याहून अधिक व्यक्तींचा समूह सार्वजनिक जागेत, रस्त्यावर किंवा चावडीवर एकत्र येऊ शकणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

