गडचिरोली जिल्ह्यातील रुग्णांच्या जीवाशी गंभीर खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस ; 3 बोगस डॉक्टरांवर गुन्हा दाखल.
📍4 वर्षांपासून " रुग्णालय " थाटून होते.हा बेकायदेशीर प्रकार आरोग्य विभागाच्या निदर्शनास कसा आला नाही ; आरोग्य यंत्रणा चार वर्षे सुस्त का ?
एस.के.24 तास
सिरोंचा : दुर्गम सिरोंचा तालुक्यातील असरअल्ली सारख्या ग्रामीण भागात,जिथे आरोग्यसेवा आधीच मर्यादित आहे, तिथे रुग्णांच्या जीवाशी गंभीर खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोणतीही अधिकृत वैद्यकीय पदवी नसताना स्वतःला " डॉक्टर " भासवून गेल्या चार वर्षांपासून सर्रास वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या तिघांविरुद्ध अखेर आरोग्य विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.
शरद बाबू वेग्ग्लम वय,६० वर्ष,चंद्रया भौथू वय,३९ वर्ष आणि गौरीशंकर बैरी वय,५० वर्ष सर्व रा.असरअल्ली,ता.सिरोंचा) अशी या बोगस डॉक्टरांची नावे आहेत.
या कारवाईमुळे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेच्या देखरेखीवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. असरअल्ली परिसरात हे तिघेही गेल्या अनेक वर्षांपासून राजरोसपणे रुग्णालय चालवत होते. ते रुग्णांना तपासत, त्यांना औषधोपचार देत आणि त्याबदल्यात शुल्कही वसूल करत होते.
त्यांच्या उपचारपद्धती आणि ज्ञानाबाबत स्थानिक अधिकृत वैद्यकीय व्यावसायिकांना संशय आला. त्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत आरोग्य विभागाकडे रीतसर तक्रार दाखल केली.
या तक्रारीच्या आधारे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोहर कन्नाके आणि सहायक आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश झाडे यांच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने या ‘रुग्णालयां’वर छापा टाकला. उपनिरीक्षक प्रवीण सोनावणे यांच्या उपस्थितीत ही संयुक्त तपास मोहीम राबवण्यात आली.
चौकशी दरम्यान, या तिघांकडेही वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही अधिकृत पदवी नसल्याचे उघडकीस आले. त्यांच्याकडे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी किंवा कोणताही कायदेशीर परवाना आढळून आला नाही. केवळ अनुभवाच्या आधारे आणि ग्रामीण भागातील रुग्णांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत हा गोरखधंदा सुरू होता.
आरोग्य विभागाच्या वतीने सिरोंचा येथील असरअल्ली पोलीस ठाण्यात ४ नोव्हेंबर रोजी रीतसर फिर्याद देण्यात आली. त्याआधारे, पोलिसांनी तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३५ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. कारवाईदरम्यान, शरद वेग्ग्लम आणि चंद्रया भौथू यांना पथकाने ताब्यात घेतले होते.
कायद्यातील तरतुदीनुसार त्यांना नोटीस बजावून सोडण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली. तिसरा संशयित आरोपी गौरीशंकर बैरी हा मात्र कारवाईची चाहूल लागताच फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक प्रसाद पवार करत आहेत.
आरोग्य यंत्रणा चार वर्षे सुस्त का ?
हे तिन्ही बोगस डॉक्टर मागील चार वर्षांपासून असरअल्ली सारख्या मुख्य ठिकाणी " रुग्णालय " थाटून बसले होते. चार वर्षे हा बेकायदेशीर प्रकार आरोग्य विभागाच्या निदर्शनास कसा आला नाही,यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या दरम्यान ग्रामीण भागातील आरोग्यसेवेवर देखरेख ठेवणारी यंत्रणा नेमकी काय करत होती, स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांना याची माहिती नव्हती का, की याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. या रॅकेट मध्ये आणखी कोणी सहभागी आहे का, याचाही शोध घेतला जात असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.