आरमोरी तालुक्यातील देलोडा बु.येथे रानटी हत्तींने उध्वस्त झालेल्या पिकामुळे मानसिक तणावात गेलेल्या शेतकऱ्याने केली आत्महत्या.

आरमोरी तालुक्यातील देलोडा बु.येथे रानटी हत्तींने उध्वस्त झालेल्या पिकामुळे मानसिक तणावात गेलेल्या शेतकऱ्याने केली आत्महत्या.


एस.के.24 तास


आरमोरी : आरमोरी तालुक्यातील देलोडा बु.येथे रानटी हत्तींच्या हल्ल्यामुळे उध्वस्त झालेल्या पिकामुळे मानसिक तणावात गेलेल्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.खुशाल बैजू पदा वय,55 वर्ष रा.देलोडा बु.असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शनिवारी, 22 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास त्यांनी विष प्राशन करून जीवनयात्रा संपवली.


अडीच वर्षांच्या परिश्रमांतून पिकवलेले धान कापून बांधणी करून पुंजणे उभारून ठेवण्यात खुशाल पदा व्यस्त होते. मात्र, 18 नोव्हेंबरच्या रात्री रानटी हत्तींच्या कळपाने त्यांच्या शेतात अचानक प्रवेश केला आणि काही क्षणांत अडीच एकरातील संपूर्ण धानपिकाची नासधूस करून टाकली. झटपट उध्वस्त झालेल्या पिकामुळे खुशाल पदा यांच्यावर मोठं आर्थिक संकट ओढावलं.


आपल्या एकमेव उपजीविकेचा आधारच हातातून गेल्याने ते खोल नैराश्यात गेले. कुटुंबाचा खर्च कसा भागवायचा? घेतलेले कर्ज फेडायचे कसे? पुढचा हंगाम उभा करायचा कसा? या प्रश्नांनी त्रस्त होऊन पदा मानसिकरीत्या कोसळले. याच निराशेच्या भरात त्यांनी विष प्राशन केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.


रविवारी सकाळी त्यांना आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथे वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. पुढील प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि तीन मुली असा परिवार आहे.या घटनेमुळे पदा कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.पदा यांच्या शेतातील धानाची पुंजणे हत्तींच्या कळपाने अक्षरशः उपसून टाकली होती. पोर्ला वनपरिक्षेत्रात रानटी हत्तींचा त्रास सातत्याने वाढत असून तांदूळ, विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.स्थानिकांच्या मते वडसा वन विभाग हत्ती हुसकावण्यासाठी ठोस पावले उचलत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.


कुटुंबीयांनी सांगितले की, मागील चार वर्षांपासून दर हंगामात खुशाल पदा यांच्या पिकांचे नुकसान हत्ती करत होते. यंदाही मोठ्या प्रमाणात हानी झाली. शेवटी या सततच्या आर्थिक चणचणीतून आणि मानसिक तणावातून त्यांनी आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. रानटी हत्तींचा प्रश्‍न सोडविण्यासाठी वन विभागाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून होत आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !