कळमना येथे लोकवर्गणीतून पुलाच्या रेलिंग चे काम पूर्णत्वास ; आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या संकल्पनेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
📍मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला कळमना ग्रामपंचायतचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
राजुरा : नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी ओळखले जाणारे आदर्श स्मार्ट गाव कळमना पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांच्या एकत्रित लोकवर्गणीतून पुलाच्या दोन्ही बाजूंना रेलिंग बसविण्याचे समाजोपयोगी कार्य पूर्ण करण्यात आले.
अपघातांच्या धोक्यामुळे वर्षांपासून प्रलंबित राहिलेल्या या कामासाठी सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या पुढाकाराला गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.विशेष बाब म्हणजे कळमना हे स्वच्छता,पर्यावरणपूरक उपक्रम आणि गावातील सर्वांगीण विकासासाठी ओळखले जाते.
‘आर.आर.आबा पाटील सुंदर गाव’ स्पर्धेत मिळालेला जिल्हा स्तरावरील प्रथम क्रमांक आणि यावर्षी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामधील सहभाग या माध्यमातून कळमनाने आपली ओळख अधिक भक्कम केली आहे. शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य व पर्यावरण क्षेत्रातील अनेक उपक्रमांनी गावाचा विकास वेगाने पुढे नेला आहे.
गावाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या पुलावरील सुरक्षिततेच्या अभावामुळे नागरिक आणि वाहनधारकांना मोठा धोका निर्माण होत होता. ही समस्या दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत गावकऱ्यांकडून लोकवर्गणी गोळा करण्याचे आवाहन केले. आवाहन होताच नागरिकांनी उत्साहाने आर्थिक सहकार्य करत पुलाचे रेलिंग बसविण्याचे काम पूर्णत्वास नेले.
रेलिंग बसवल्यानंतर केवळ अपघाताचा धोका कमी झाला नाही, तर पुलाचे सौंदर्यही अधिक खुलले असून गावात प्रवेश करताना आकर्षक दृश्य दिसू लागले आहे. यामुळे गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
या कार्याच्या पूर्ततेनिमित्त सरपंच नंदकिशोर वाढई, पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे, तंटामुक्त समिती अध्यक्ष निलेश वाढई, हनुमान मंदिर देवस्थान कमिटी अध्यक्ष प्रभाकर साळवे, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष महादेव ताजने, कवडू पाटील गौरकार, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग क्षीरसागर, कवडू मुठलकर
सुरेश गौरकर, अमोल निमकर, योगराज वाढरे, श्रीकांत कुकुडे, श्रावण गेडाम, अरुण आस्वले, दिनेश वांढरे, प्रीतम पाल, शुभम वाढई, प्रीतम वाढरे, सचीन विरुटकर, सुरज कुकुडे, रामदास भाऊ, अनिल भाऊ, विशाल नागोसे, सुनिल मेश्राम यासह स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

