एकाच दिवशी पाऊण तासाच्या फरकाने महादवाडी व मामला च्या जंगलात बांबू तोडणाऱ्या 2 मजुराचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यु.
📍यावर्षी वाघ आणि इतर वन्यजीवांच्या हल्ल्यात 46 लोकांचा मृत्यू झाला.
एस.के.24 तास
चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील महादवाडी व मामलाच्या जंगलात बांबू तोडणाऱ्या 2 मजुरावर वाघाने हल्ला केला.या दोन्ही मजुराचा मृत्यु झाल्याने खळबळ उडाली आहे.प्रेमसिंग दुखी उदे वय,55 वर्ष रा.बालाघाट, बुदसिंग श्यामलाल मडावी वय,41वर्ष रा.मुंडला, बालाघाट) अशी मृतांची नावे आहेत.यावर्षी आता पर्यंत 46 जणांचा मानव वन्यजीव संघर्षत बळी गेला आहे.
ताडोबा बफर क्षेत्रात बांबू कटाईचे काम सुरू आहे. वनविभागाने बालाघाट येथून कामासाठी मजूर बोलावले आहेत. काही मजूर महादवाडी बिटात तर काही मामला बिटात बांबू कटाईचे काम करत आहेत.
मामला बिटातील कक्ष क्रमांक,381 मध्ये दुपारी 3:45 च्या सुमारास बांबू कटाईचे काम करण्यात मग्न असलेल्या बुदशिंग श्यामलाल मडावी यांच्यावर अचानकपणे वाघाने हल्ला चढवून जागीच ठार केले.
ही घटना ताजी असताना व याबाबत चौकशी सुरू असतानाच पाऊण तासाच्या फरकाने या घटनास्थळापासून काहीच अंतरावर महादवाडी बफर झोन कक्ष क्रमांक,357 मध्ये प्रेमसिंग दुखी उदे यांच्यावर दुपारी 4:30 वाजता च्या सुमारास वाघाने हल्ला चढवून जागीच ठार केले.
या दोन्ही घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभाग त्यांनीच कामाला लावलेल्या मजूरांना संरक्षण देऊ शकत नाही तर सर्वसामान्य नागरिकांना ते संरक्षण कसे देणार याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली असून वनविभागाद्वारे तातडीने या वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरून पुढे आली आहे.
वनविभागाच्या विरोधात वातावरण तापत असून वनविभाग अजून किती नागरिकांचे नाहक बळी घेणार ? या घटनेमुळे परिसरात भिती व दहशतीचे वातावरण आहे. यावर्षी वाघ आणि इतर वन्यजीवांच्या हल्ल्यात 46 लोकांचा मृत्यू झाला.