किरकोळ वादातून भयानक घटना दारूच्या नशेत माय - लेकीची हत्या ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल.
एस.के.24 तास
उमरेड : नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथून हत्येचं एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे.शनिवारी (27 डिसेंबर) एका दारूच्या नशेत असलेल्या व्यक्तीने शेजारी राहणाऱ्या माय - लेकीची हत्या केल्याचं वृत्त आहे.संबंधित घटना उमरेडच्या गंगापूर कालवा परिसरात घडली असून यामध्ये आई आणि मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पर्वता फुकट आणि संगीता रिठे अशी मृतांची ओळख समोर आली आहे. या भयानक घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रकरणातील आरोपी तरुणाचं नाव नीतेश किसन ठाकरे असून नशेत असताना त्याने आपल्या शेजारी राहणाऱ्या आई आणि मुलीवर हल्ला करून त्यांची निर्घृण हत्या केली.किरकोळ वादातून ही भयानक घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. उमरेड येथील गंगापूर कालवा परिसरातील झोपडपट्टीत शनिवारी दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती समोर आली आहे.
आरोपी नीतेश याचा पार्वता शंकर फुकट आणि त्यांची मुलगी संगीता वसंता रिठे यांच्यासोबत किरकोळ कारणावरून वाद झाला. दरम्यान, त्यांच्या शाब्दिक चकमक उडाली आणि या वादाचं हाणामारीत रूपांतर झालं.त्यावेळी, दारूच्या नशेत असलेल्या संतापलेल्या नीतेशने जवळच असलेला लाकडी दांडा उचलला आणि पार्वता व मुलगी संगीता यांच्या डोक्यावर जोरदार हल्ला केला.त्यानंतर, दोघीही गंभीररित्या जखमी होऊन जमिनीवर कोसळल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची त्वरीत पोलिसांना माहिती देण्यात आली आणि घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. उमरेडचे पोलीस निरीक्षक धनाजी जळक यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेचा तपास सुरू करण्यात आला. प्रकरणाच्या तपासादरम्यान,आरोपी हा पीडितांच्या घराशेजारी राहत असून तो दारूच्या व्यसनाच्या आहारी गेला असल्याचं समोर आलं.
दारूच्या नशेत तो नेहमी घरातील सदस्य आणि शेजाऱ्यांसोबत वाद घालत असल्याचा आरोप आहे. याप्रकरणी, आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 103 (1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी नीतेशला अटक करण्यात आली आहे.

