तुमसर - गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात दुचाकीला ट्रॅक्टरची जोरदार धडक बसून 2 ITI तरुणांचा जागीच मृत्यू
एस.के.24 तास
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील विरशी फाट्याजवळ तुमसर - गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात दुचाकीला ट्रॅक्टरची जोरदार धडक बसून 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाला.या हृदयद्रावक घटनेने देव्हाडी गावावर शोककळा पसरली आहे.2 तरूणांच्य अकाली निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणांची नावे यश राजेश उईके 19 वर्ष व भारत भगवान बनकर वय,18 वर्ष अशी असून दोघेही देव्हाडी ता.तुमसर येथील रहिवासी होते. यश हा स्वतःच स्वेटर दवनीवाडा येथील मावशीकडे विसरून आला होता.ते आणण्यासाठी यश व त्याचा जीवलग मित्र भारत हे दुचाकी क्र. MH.36 AP. 6454 ने देव्हाडीहून निघाले.
विरशी फाट्याजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॅक्टरशी दुचाकीची भीषण धडक झाली. धडक इतकी जबरदस्त होती की दोघांचाही जागीच मृत्यू झाला.यश व भारत हे दोघेही तुमसर येथील सातपुडा आयटीआयचे विद्यार्थी होते.अभ्यासू, शांत स्वभावाचे आणि कायम एकत्र असणारे हे दोघे मित्र परिसरात परिचित होते.
भारत यांच्या वडिलांचे देव्हाडी येथे भाजी विक्रीचे दुकान असून,यश उईके यांचे वडील रेल्वे विभागात कर्मचारी आहेत. दोन तरुण जीवांचा असा अचानक अंत झाल्याने देव्हाडी गावात शोकसागर उसळला आहे. घराघरांतून हळहळ व्यक्त होत असून, नातेवाईक व मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

