मोरवा ते राजुरा मार्गावर राजुरा येथील सिव्हिल कंत्राटदाराचे भर दिवसाढवळ्या बंदुकीचा धाक दाखवून अपहरण.
📍१८ लाख रुपये खंडणी उकळल्याची धक्कादायक घटना ; तिघांना अटक.
एस.के.24 तास
चंद्रपूर : राजुरा येथील सिव्हिल कंत्राटदाराचे भर दिवसाढवळ्या बंदुकीचा धाक दाखवून अपहरण केले.नंतर त्याच्याकडून १८ लाख रुपये खंडणी उकळल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी २६ डिसेंबर रोजी उघडकीस आली आहे.
आकाश वाढई (रा. राजुरा), भारत माडेश्वर (बल्लारपूर),योगेश अशा तिघांना रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे.
घाबरलेल्या काहीलकर यांनी पैसे नसल्याचे सांगितले. मात्र, आरोपींनी मारण्याची धमकी दिली. सायंकाळी ५ वाजेपासून मध्यरात्री १२.३० वाजेपर्यंत त्यांना बंदुकीच्या धाकावर चंद्रपूर शहर फिरवले, जंगल परिसरात नेले आणि गंभीर धमक्या दिल्या. शेवटी आरोपींनी थेट घरून पैसे आणण्याचा आदेश दिला.
मध्यरात्री सुमारे १.३० वाजता आरोपी काहीलकर यांना घेऊन त्यांच्या घरी पोहोचले. यानंतर काहीलकर यांनी घरातील १८ लाख रुपये दिल्यानंतर अपहरणकर्ते तेथून पसार झाले. हा थरार बघून काहीलकर यांच्या पत्नीला प्रचंड धक्का बसला आणि त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले. घटनेनंतर काहीलकर यांनी राजुरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
घटना पडोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने प्रकरण पडोली ठाणेदार योगेश हिवसे यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. वृत्त लिहिपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. मात्र, दिवसाढवळ्या घडलेल्या या खंडणीच्या घटनेमुळे चंद्रपूर - राजुरा परिसरात खळबळ उडाली आहे.

