तुझ्या बहिणीला हार्ट ॲटक आला,लवकर ये ; सासरी पोहोचताच भावाच्या पायाखालची जमीन सरकली.
एस.के.24 तास
गोंदिया : " तुमच्या बहिणीला अचानक छातीत दुखू लागलंय आणि तिला हार्टअटॅक आलाय, लवकर घरी या, " असा फोन सासरच्यांनी केला. हे ऐकून काळजात धस्स झालेला भाऊ मिळेल त्या वाहनाने बहिणीच्या सासरी पोहोचला. मात्र, तिथे पोहोचताच जे दृश्य दिसले, ते पाहून तो जागच्या जागी थिजला. बहिणीचा मृतदेह पाहून त्याने हंबरडा फोडला. हृदयविकाराचा झटका नव्हे, तर बहिणीची निर्घृण हत्या करून तिला मारण्यात आल्याचा गंभीर आरोप आता या भावाने केला आहे. गोंदियातील गणेशनगर भागात घडलेल्या या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.
नेमकी घटना काय ? गोंदिया शहरातील गणेशनगर,गणेश अपार्टमेंट (फ्लॅट क्र. ३०१) येथे शनिवारी (दि.६) ही खळबळजनक घटना उघडकीस आली. सरिता पराग अग्रवाल (वय २७) असे मृत विवाहितेचे नाव आहे. सरिताचे भाऊ प्रदीप गुप्ता आणि विजय गुप्ता यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, शुक्रवारी रात्री उशिरा त्यांना सरिताच्या सासरच्या लोकांनी फोन करून सांगितले की, "सरिताला हृदयविकाराचा झटका आला आहे."
घाबरलेल्या भावाने आणि माहेरच्या मंडळींनी तातडीने गोंदिया गाठले. मात्र, घरी पोहोचल्यावर सरिता मृतावस्थेत आढळली. तिच्या शरीराची पाहणी केली असता, तिच्या अंगावर आणि गळ्यावर मारहाणीच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. हा नैसर्गिक मृत्यू नसून आपल्या बहिणीचा खून करण्यात आल्याचा आरोप भावाने केला आहे.
आत्महत्या की हत्या ? सासरच्या मंडळींनी सुरुवातीला सरिताने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव रचल्याचेही समोर येत आहे.माहेरच्यांच्या म्हणण्यानुसार सरिताच्या शरीरावर मारहाणीचे व्रण होते.तिचा गळा चिरल्यासारखा दिसत होता.तिच्या १४ महिन्यांच्या चिमुकल्या मुलीच्या पायालाही जखमा होत्या.यावरून सरिताला बेदम मारहाण करून,गळा आवळून तिची हत्या करण्यात आली आणि नंतर त्याला आत्महत्येचे किंवा हृदयविकाराचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला गेला, असा दावा तिच्या भावाने केला आहे.
हुंडा आणि छळाचे गंभीर आरोप सरिता ही मूळची छत्तीसगडमधील डोंगरगड येथील होती. २०२३ मध्ये तिचा विवाह गोंदियातील पराग अग्रवाल याच्याशी झाला होता. लग्नानंतर काही महिने सुखाचे गेले, मात्र त्यानंतर सासू, नणंद आणि पती पराग यांनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला. किरकोळ कारणांवरून तिला मारहाण केली जात असे. पती पराग याचे दुसऱ्या महिलेशी संबंध असल्याचा आणि त्यातूनच हे हत्याकांड घडल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे.
पोलिसांची भूमिका या घटनेची माहिती मिळताच गोंदिया शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून,अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.पोलिसांनी सरिताचा पती पराग अग्रवाल याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे,पराग अग्रवाल हा काही दिवसांपूर्वीच एका बनावट दारू प्रकरणात जामिनावर बाहेर आला होता,अशी माहिती समोर आली आहे.
या घटनेमुळे १४ महिन्यांची चिमुकली " कायरा " पोरकी झाली असून, सरिताच्या कुटुंबाने आरोपींना कडक शिक्षा करण्याची मागणी केली आहे. या घटनेने गोंदिया शहरात संताप व्यक्त केला जात आहे.

