पैशांसाठी शेतकऱ्याला किडनी विकायला लावनाऱ्या ब्रम्हपुरीतील अवैध सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल ;५ जण ताब्यात.
एस.के.24 तास
नागभीड : ब्रम्हपुरी शहरात अवैध सावकारी करून कर्जदाराची अमानुष पद्धतीने आर्थिक,मानसिक व शारीरिक पिळवणूक केल्याप्रकरणी ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात सहा सावकारांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
नागभीड तालुक्यातील मिंथुर (मिथुर) येथील ३६ वर्षीय मजूर रोशन शिवदास कुळे यांनी १६ डिसेंबर रोजी ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार,२ फेब्रुवारी २०२१ रोजी त्यांनी ब्रम्हपुरी येथील एका सावकाराकडून एक लाख रुपये व्याजाने घेतले होते.
त्यापैकी १५ हजार रुपये ३१ मार्च २०२१ रोजी परत केले.उर्वरित ८५ हजार रुपये वेळेत न भरल्याने सावकाराने २० टक्के दराने व्याज व दररोज पाच हजार रुपये दंड आकारण्याची धमकी दिली. पैसे न दिल्यास घरातील मौल्यवान वस्तू उचलून नेण्याची धमकीही देण्यात आली.
या दबावामुळे फिर्यादीने वेगवेगळ्या सावकारांकडून कर्ज घेतले.सावकारांना पैसे देण्यासाठी आतापर्यंत सुमारे ४८ लाख ५३ हजार रुपये दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. आर्थिक विवंचनेमुळे फिर्यादी कंबोडिया येथे जाऊन स्वतःची किडनी विकल्याचा धक्कादायक आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, सन २०२१ ते जून २०२३ या कालावधीत आरोपींनी संगनमत करून अव्वाच्या सव्वा व्याजाची वसुली केली. वसुलीसाठी फिर्यादीस डांबून ठेवून अश्लील शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली व गंभीर दुखापत करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ६५४/२०२५ अन्वये भारतीय दंड संहिता कलम १२०(ब), ३२६, ३४२, २९४, ३८७, ५०६, ३४ तसेच महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम ३९ व ४४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यातील आरोपी मनिष पुरुषोत्तम घाटबांधे, किशोर रामभाऊ बावणकुळे, लक्ष्मण पुंडलिक ऊरकुडे सर्व रा. ब्रम्हपुरी, प्रदीप रामभाऊ बावणकुळे रा. देलनवाडी, ब्रम्हपुरी, संजय विठोबा बल्लारपुरे व सत्यवान रामरतन बोरकर रा.ब्रम्हपुरी आहेत.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अधीक्षक मम्मुका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले करीत आहेत.
चंद्रपूर जिल्हा पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की,जर कोणी अवैध सावकार मुद्दलाच्या रकमेवर अव्वाचे सव्वा व्याज आकारून आर्थिक, शारीरिक व मानसिक छळ करीत असेल तर तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष ११२ किंवा ७८८७८९०१०० या क्रमांकावर माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल तसेच अवैध सावकारांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

