रोशनकुमार शामजी पिलेवान यांच्या लेखणीतून...
पान संपले,साल संपले असे म्हणावे का ?
दीन दुबळ्यांचे हाल संपले असे म्हणावे का...
पान संपले,साल संपले असे म्हणावे का ?
दीन दुबळ्यांचे हाल संपले असे म्हणावे का...
गाड्या, बंगले, इमारतींचा झगमग जेथे तेथे
मग सारे कंगाल संपले असे म्हणावे का ?
हट्ट चालला बाल मनाचा पिझ्झा-बर्गर साठी
ते " बुड्डी के बाल " संपले असे म्हणावे का ?
कर्कश डिजे, रिमिक्स छळतो करतो लाहीलाही
विश्वातील सुर ताल संपले असे म्हणावे का ?
विश्व अडकले सारे कारे आंतरजालामध्ये
मोह,मायाजाल संपले असे म्हणावे का ?
अन्यायावर वार कराया उरल्या ना तलवारी
वार झेलण्या ढाल संपले असे म्हणावे का ?
वृध्दाश्रम वाढलेत आणिक परवड म्हाताऱ्यांची
इथले "मां के लाल" संपले असे म्हणावे का ?
जेथे तेथे स्पा पार्लरचा सुकाळ आला मोठा
ओठ,गुलाबी गाल संपले असे म्हणावे का ?
************************************
✍️रोशनकुमार शामजी पिलेवान मु.पो.पिंपळगांव (भोसले) तालुका ब्रम्हपुरी जिल्हा चंद्रपूर मो.7798509816

