गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात एका बसचा मोठा अपघात टळल्याची घटना समोर..! काळ आला होता पण,वेळ आली नव्हती.
एस.के.24 तास
सिरोंचा : गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात एका बसचा मोठा अपघात टळल्याची घटना समोर आली आहे.सुमारे 30 प्रवाशांना घेऊन जाणारी बस मोठ्या नाल्याच्या वळणावर उलटून अर्ध्यावरच लटकली.सुदैवाने बस थेट 6 फूट खोल पाण्यात कोसळली नाही.अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती.या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे.
सिरोंचावरून रेगुंटाकडे जाणारी एसटी बस रात्रीच्या सुमारास कंबालपेटा नाला ते टेकडा परिसरात आली होती. या ठिकाणी पुलाचे काम सुरू असल्यामुळे वाहतुकीसाठी तात्पुरता कच्चा वळण मार्ग तयार करण्यात आला आहे. रात्री अंधारात या वळणावरून जात असताना चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस थेट नाल्याच्या कडेला जाऊन एका बाजूला झुकली. बस नाल्यात पडणार अशी परिस्थिती निर्माण झाल्याने प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला.
बस एका बाजूला लटकलेली असताना प्रवाशांनी प्रसंगावधान राखत खिडक्यांमधून आणि दरवाज्यातून बाहेर पडण्यास सुरुवात केली. काही प्रवाशांनी एकमेकांना मदत करत सुरक्षितपणे बाहेर काढले. नाल्यात सुमारे 6 फूट पाणी असल्याने बस पूर्णपणे उलटली असती तर मोठी जीवितहानी झाली असती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
धक्कादायक बाब म्हणजे अपघातानंतर चालकाने प्रवाशांना मदत न करता स्वतः बसमधून उडी मारून घटनास्थळावरून पळ काढला.त्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाची भावना आहे. रात्रीच्या वेळी परिसर निर्जन असल्याने मदत मिळण्यास उशीर झाला.स्थानिक नागरिकांनी पुलाचे काम संथ गतीने सुरू असल्याचा आणि कच्चा रस्ता धोकादायक असल्याचा आरोप केला आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधितांवर तसेच चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

