❗कुरखेडा येथे प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या ; प्रियकर व प्रेयसी ला अटक.
📍मृतदेह मोटार सायकलवर सती नदीच्या नवीन पुलाच्या बांधकामस्थळी मृतदेह फेकून अपघाताचा बनाव.
एस.के.24 तास
कुरखेडा : प्रेम प्रकरणात अडसर ठरणाऱ्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याची घटना कुरखेडा येथे मंगळवारी (ता.30) मध्यरात्री घडली.देवानंद सूर्यभान डोंगरवार वय,32 वर्ष, रा.गेवर्धा ता.कुरखेडा जिल्हा.गडचिरोली असे मृत पतीचे नाव आहे.या प्रकरणी पोलिसांनी पत्नी रेखा उर्फ सोनी डोंगरवार व तिचा प्रियकर विश्वजित सांगोळे वय,25 वर्ष यांना अटक केली आहे. नववर्षाच्या आदल्या रात्रीच ही घटना घडल्याने कुरखेडा तालुका हादरला आहे.
2018 मध्ये गेवर्धा येथील देवानंद डोंगरवार याचा आंधळी येथील रेखा उर्फ सोनी नागोसे वय,28 वर्ष नामक युवतीशी आंतरजातीय विवाह झाला.सुरुवातीला दोघांचाही संसार सुरळीत होता.अशातच गेवर्धा येथील महामार्ग बांधकाम करणाऱ्या कंपनीत वाहन चालक म्हणून कार्यरत राजोली येथील विश्वजित सांगोळे नामक युवकाशी रेखाची ओळख झाली.
ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले.त्यानंतर दोन महिन्यांतच रेखाने घर सोडले.आता रेखा पती पासून विभक्त होऊन विश्वजित सांगोळे याच्याबरोबर कुरखेडा येथील राणा प्रताप वॉर्डात राहू लागली.यामुळे व्यथित होऊन देवानंदने रेखाला घरी परत येण्याची अनेकदा विनंती केली.पुढे हे प्रकरण तंटामुक्त गाव समितीकडे गेले.
परंतु रेखा उपस्थित राहिली नाही.त्यामुळे विवाह बंधनातून मुक्त होण्याचा सल्ला तंटामुक्त समितीने दिला.मला देवानंदसोबत संसार करायचा नाही,आंतरजातीय विवाहासाठी शासनाकडून मिळालेले 50 हजार रुपये मिळाल्याशिवाय मी सोडचिठ्ठी देणार नाही अशी अट रेखाने घातली.
त्या नंतरही देवानंद अधूनमधून कुरखेड्यात पत्नीकडे तिला समजावण्यासाठी जायचा.मंगळवारी (दि.30) तो तिच्या घरी गेला.रात्री देवानंद,रेखा आणि विश्वजित यांच्यात वाद झाला. वाद एवढा विकोपाला गेला की रेखा आणि विश्वजित यांनी देवानंदच्या डोक्यावर प्रहार केले.तो रक्तबंबाळ होऊन मृत्यूमुखी पडला.
यामुळे घाबरलेल्या विश्वजितने रेखाच्या मदतीने मध्यरात्री देवानंदचा मृतदेह मोटार सायकलवर सती नदीच्या नवीन पुलाच्या बांधकामस्थळी नेला.तेथे मृतदेह फेकून स्वत:च्याच मोटारसायकलची तोडफोड केली.कुणावरही संशय येऊ नये म्हणून विश्वजित व रेखाने अपघाताचा बनाव केला.
माहिती मिळताच पोलिसांनी मंगळवारी रात्रीच घटनास्थळ गाठले. तेथे पाहणी केली असता रक्ताचे डाग आढळून आले.हे डाग थेट रेखाच्या घरापर्यंत गेल्याचे दिसून आले.यावरुन पोलिसांचा संशय बळावला. अर्धा तासातच त्यांनी रेखा व विश्वजित सांगोळे यांना खुनाच्या गुन्ह्यात अटक केली. पोलिस निरीक्षक महेंद्र वाघ यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.

