" वायगावची बालकविता " पुस्तकाचे प्रकाशन : चिमूकल्यांच्या काव्यप्रतिभेला चालना.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : तालुक्यातील जि.प.उच्च प्राथ.शाळा वायगाव येथील विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या कवितांचे शिक्षक गुलाब बिसेन यांनी संपादित केलेल्या 'वायगावची बालकविता' या पुस्तकाचे प्रकाशन ब्रम्हपुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा.रविंद्रजी घुबडे यांच्याहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
जि.प.उच्च प्राथ.शाळा वायगाव ता.ब्रम्हपुरी या शाळेतील उपक्रमशील शिक्षक यांनी 'लिहून बघू' या उपक्रमातून मागील दोन वर्षांपासून मुलांना वाचनासोबत लेखनाची गोडी लावली आहे. यातून विद्यार्थी कविता लेखनाकडे वळले. याच उपक्रमातून फुललेल्या कवितांचा वायगावची बालकविता हा कवितासंग्रह आहे.
या कविता संग्रहात इयत्ता पाचवी ते आठवीच्या चौदा विद्यार्थ्यांच्या सव्वीस कवितांचा समावेश आहे. या संग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक डाॅ.सुरेश सावंत यांची प्रस्तावना आहे. ३३ व्या झाडीबोली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डाॅ. धनराज खानोरकर यांनी शुभेच्छा देऊन आशीर्वादित केले आहे. प्रसिद्ध साहित्यिक डाॅ.श्रीकांत पाटील यांनी या कवितासंग्रहाची पाठराखण केली आहे.
यावेळी पंचायत समिती ब्रम्हपुरीचे गटविकास अधिकारी मा. रविंद्र घुबडे, गटशिक्षणाधिकारी मा.डाॅ.विद्या शेळके मॅडम, केंद्रप्रमुख वाळके मॅडम, सरपंच मा. गुरूदेवजी तुपट, उपसरपंच मा. चक्रधर ढोक, मुख्याध्यापक मा. धनराज भोयर, शाळा व्यव. समिती अध्यक्ष मा. प्रमोद काटलाम, मा. रामेश्वर मर्हसकोल्हे, सर्व शिक्षक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

