धानोरा तालुक्यातील निमगाव (रांगी) जंगल परिसरात अवैध सागवान तस्करीवर वनविभागाने मोठी कारवाई करत तिघांना रंगेहात अटक.
एस.के.24 तास
धानोरा : तालुक्यातील निमगाव (रांगी) जंगल परिसरात सुरु असलेल्या अवैध सागवान तस्करीवर वनविभागाने मोठी कारवाई करत तिघांना रंगेहात अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरातील लाकूड तस्करांमध्ये खळबळ उडाली असून वनविभागाने तस्करांविरोधात कडक भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,28 फेब्रुवारी 2026 रोजी वनविभागाचे पथक नियमित गस्तीवर असताना कक्ष क्रमांक 436 मध्ये काही व्यक्ती अवैधरित्या सागवान लाकडाची कटाई करत असल्याचे निदर्शनास आले.तात्काळ सापळा रचून संबंधित तिघांना रंगेहात पकडण्यात आले.
अटकेतील आरोपींमध्ये अविनाश एकनाथ गावळे वय,45 वर्ष,आनंदराव चित्रू पदा वय,50 वर्ष आणि पितांबर मसरु दुगा वय,55 वर्ष सर्व रा.निमगाव ता.धानोरा जि.गडचिरोली) यांचा समावेश आहे. त्यांना 29 मार्च रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 2 दिवसांची वन कोठडी सुनावली.
ही कारवाई सहाय्यक वनसंरक्षक महेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनाखाली रांगी उपक्षेत्रातील क्षेत्रसहाय्यक के.व्ही. ढवळे, वनरक्षक एम.एन.कोहळे, एम.एम.राऊत आणि एस.के.हलामी यांच्या पथकाने केली.
या प्रकरणी भारतीय वन अधिनियम 1927 अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.निमगाव व आसपासच्या जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध लाकूड कटाई सुरु असल्याची चर्चा असून या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास उपवनसंरक्षक आर्या व्ही. एस. यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक महेंद्र यादव व उत्तर धानोरा परिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.बी.कायते यांच्या नेतृत्वाखाली वनकर्मचारी करीत आहेत.

