रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टर च्या अपघातात एक ठार तर दुसरा गंभीर जखमी.

रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टर च्या अपघातात एक ठार तर दुसरा गंभीर जखमी. 


एस.के.24 तास 


गोंडपिपरी : शासकीय कामांसाठी मुबलक प्रमाणात रेती उपलब्ध होत असताना, घरकुलाच्या बांधकामासाठी मात्र सर्वसामान्यांना रेती मिळवताना मोठा संघर्ष करावा लागत आहे. याच टंचाईचा फायदा आता रेती तस्करांनी उचलला असून, रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला आहे.


या घटनेत एका 24 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून,दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील फुरडीहेटी-वढोली मार्गावर आज (बुधवारी) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. संतोष मडावी असे मृताचे नाव असून, साहिल कोवे हा गंभीर जखमी आहे.


गोंडपिपरी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी केली जाते, परंतु याकडे महसूल विभागाचे कायमचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे. एकीकडे सरकारी कामांसाठी रेतीची कमतरता नसताना, घरकुल लाभार्थ्यांना मात्र अवैध रेती तस्करांवर अवलंबून राहावे लागत आहे. याच तस्करीमुळे आज एका निष्पाप तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, गोंडपिपरी तालुक्यातील कुलथा रेती घाटावरून चेक बोरगाव येथील घरकुल लाभार्थ्यासाठी रेती घेऊन एक विना क्रमांकाचा ट्रॅक्टर निघाला होता. महसूल आणि पोलीस विभागाच्या कारवाईपासून वाचण्यासाठी चालक ट्रॅक्टर भरधाव वेगाने चालवत होता. 


फुरडीहेटी - वढोली मार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर रस्त्याच्या खाली उलटला. ट्रॉलीवर संतोष सुंदरशहा मडावी वय,24 वर्ष व साहिल कोवे हे दोघे बसले होते.हा अपघात इतका भीषण होता की, संतोषचा जागीच मृत्यू झाला,तर साहिल गंभीर जखमी झाला.पोलिसांकडून चालकाला अटक करण्यात आली.


घटनेची माहिती मिळताच गोंडपिपरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. या प्रकरणी ट्रॅक्टर चालक आकाश गोरकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले.


पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करत आहेत.मृत संतोषच्या पश्चात आई-वडील आणि पाच भाऊ असा परिवार आहे. कुटुंबातील कर्त्या तरुणाचा अकाली मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


या घटनेनंतर आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या व्यवहारासाठी वापरण्यात आलेल्या 'टीपी'वर (Transport Permit) जो ट्रॅक्टर क्रमांक नमूद करण्यात आला होता, तो चुकीचा होता. संबंधित क्रमांकाचा ट्रॅक्टर एका फायनान्स कंपनीने यापूर्वीच जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. 


प्रत्यक्षात ज्या ट्रॅक्टरने रेतीची वाहतूक केली जात होती,त्यावर कोणताही क्रमांक नव्हता.यामुळे या तस्करीचे रॅकेट किती खोलवर पसरले आहे, हे स्पष्ट होत आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !