अवैधरित्या सागवान व बिजा वृक्षतोड प्रकरणी तिघांना अटक..!
एस.के.24 तास
गडचिरोली : अवैधरित्या सागवान व बिजा वृक्षतोड केल्याप्रकरणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तिघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना उद्या, सोमवार 30 मार्च पर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली आहे. संतोष देवराव तोफा, कालिदास बिड्डू आतला व चिन्नू रैनू दुगा अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून अवैध वृक्षतोडीची घटना गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील लेखा - मेंढा गावालगतच्या जंगल परिसरात उघडकीस आली.
मेंढा येथील वनरक्षक एच.के.मडावी व क्षेत्र सहायक ए.के. गांगरेड्डीवार हे दुधमाळा परिसरात गुरुवार,26 मार्च 2026 रोजी गस्तीवर असतांना मेंढा गावालगत संतोष देवराव तोफा यांच्या शेतात सागवान व बिजा प्रजातीची झाडे पडलेली आढळून आली.ही झाडे अवैधरित्या जंगलातून तोडून आणल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईत वनाधिकाऱ्यांनी 19 सागवान व 2 बिजा प्रजातीची लाकडे जप्त केली.
भारतीय वन अधिनियम 1927 अन्वये तिघांना अटक करून त्यांना उद्यापर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली आहे. सदरची कारवाई उपवनसंरक्षक आर्या व्ही.एस,सहाय्यक वनसंरक्षक अंबरलाल मडावी यांच्या मार्गदर्शनात दक्षिण धानोराचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुमित पुरमशेट्टीवार यांचेसह पथकाने केली.

