तळोधी (मोकासा) गावाजवळ स्कॉर्पिओ आणि ट्रॅव्हल्स च्या भीषण अपघातात 6 जण ठार ; 5 गंभीर जखमी.
📍मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता.
एस.के.24 तास
चामोर्शी : (दिनांक,29/03/2026 रविवार गडचिरोली-चामोर्शी मार्गावर रविवारी सायंकाळी 6 : 30.वा.च्या सुमारास काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. लग्न सोहळा आटोपून परतणाऱ्या वऱ्हाड्यांच्या स्कॉर्पिओ गाडीला समोरून येणाऱ्या ट्रॅव्हल्सने जोरदार धडक दिली.या भीषण अपघातात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला असून,अन्य 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 2 जणांचा रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार,स्कॉर्पिओ वाहन क्रं.MH 46 P 5392 रामपूर येथून लग्न सोहळा आटोपून भाडभीडी मोकासाकडे जात होते.या वाहनात एकूण 16 प्रवासी प्रवास करत होते.गडचिरोली - चामोर्शी मार्गावरील तळोधी (मोकासा) गावाजवळ असलेल्या एका धोकादायक वळणावर,समोरून येणाऱ्या प्रवासी ट्रॅव्हल्सने (क्रमांक MH 15 CK 5005) स्कॉर्पिओला भीषण धडक दिली.
ही धडक इतकी जबरदस्त होती की,स्कॉर्पिओ वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू केले.लग्नाच्या आनंदाचे रूपांतर काही क्षणांतच आक्रोशात झाले.
मृतांची नावे : -
(1) अनिकेत बर्लावार वय 26 वर्षें राहणार भाडभीडी
(2) आरोही मोगरकर वय 08 वर्षें रा . गट्टेगुडा
(3) सुमन गव्हारे वय 60 वर्षें राहणार कुणघाडा
(4) विमलाबाई गव्हारे वय 60 वर्षें रा. कुणघाडा
जखमीची नावे : -
(1)गुरुदेव कुणघाडकर वय 60 वर्षें राहणार भाडभीडी
(2) सुधाकर कुणघाडकर वय 60 वर्षें राहणार भाडभीडी
(3) वेदांत वैरागडे वय 22 वर्षे रा.भाडभीडी
(4) प्रतिमा मानमुडकर वय 35 वर्षें रा. गिलगाव
(5)निखिल दराडे रा.भाडभीडी वय 17 वर्षें
(6)संजय वैरागडे वय 17 वर्षें रा. भाडभीडी
(7) कुणाल कन्नाके वय 21 वर्षें रा.भाडभीडी
(8)रेखा चलाख वय 55 वर्षें रा. जुनोना
(9) अमर चलाख वय 57 वर्षें रा. जुनोना
(10)देवाजी गव्हारे वय 55 रा.कुणघाडा
(11) गुरूदास वासेकर वय 60 वर्षें राहणार भिवापूर
अपघातात गंभीर जखमी झालेल्या सर्व प्रवाशांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालय,गडचिरोली येथे हलवण्यात आले. मात्र, उपचारासाठी नेत असताना दोघांचा प्राण वाटेतच गेला. सध्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमींपैकी काहींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली असून, अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे.
या भीषण अपघातामुळे भाडभीडी मोकासा परिसरात शोककळा पसरली असून, महामार्गावरील धोकादायक वळणांवर उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

