गडचिरोली जिल्यातील चांभार्डा येथे वाघ-बिबट्याची झुंज ; जखमी बिबट्याजवळ गेलेल्या चौघांवर हल्ला, तिघे जन गंभीर…!

गडचिरोली जिल्यातील चांभार्डा येथे वाघ-बिबट्याची झुंज ; जखमी बिबट्याजवळ गेलेल्या चौघांवर हल्ला, तिघे जन गंभीर…!


एस.के.24 तास 


गडचिरोली : तालुक्यातील चांभार्डा येथे आज सकाळी सुमारे आठ वाजताच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. वाघ आणि बिबट्या यांच्यात झालेल्या भीषण झुंजीनंतर गंभीर जखमी झालेल्या बिबट्याजवळ जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही नागरिकांवर बिबट्याने अचानक हल्ला चढवला.या हल्ल्यात चार जण जखमी झाले असून, त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

         

मिळालेल्या माहितीनुसार, वाघ आणि बिबट्या यांच्यात झालेल्या संघर्षात वाघ वरचढ ठरला. या झुंजीत बिबट्या गंभीर जखमी झाला होता. जखमी अवस्थेत तो परिसरातच पडून असल्याने काही नागरिकांनी उत्सुकतेपोटी त्याच्याजवळ जाऊन पाहण्याचा व फोटो काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, जखमी अवस्थेत असतांनाही बिबट्याने अचानक आक्रमक होत चौघांवरही हल्ला केला. या घटनेत विलास ठाकरे (वय ४८), रेखा विठ्ठल मडावी (वय ४५, दोघेही रा. चांभार्डा) तसेच लुमाजी मुनघाटे (वय ४०, रा. टेंबा) हे गंभीर जखमी झाले आहेत. तर लीलाधर मुनघाटे (वय ३७, रा. चांभार्डा) हे किरकोळ जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.जखमींना तत्काळ अमिर्झा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर गंभीर जखमी असलेल्या तिघांना पुढील उपचारासाठी गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

       

दरम्यान,या झुंजीनंतर बिबट्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. वन विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार, वाघाच्या हल्ल्यात बिबट्याच्या चेहऱ्याचा व डोळ्यांचा मोठ्या प्रमाणात चावा घेतल्याने त्याचा मृत्यू झाला. या गंभीर घटनेनंतर वन विभागाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 


संबंधित क्षेत्र हे पोरला वनपरिक्षेत्र व वडसा येथील उपवनसंरक्षक (DCF) यांच्या अधिकारक्षेत्रात येत असतांना, घटनेबाबत माहिती विचारण्यासाठी संपर्क साधला असता संबंधित अधिकाऱ्यांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही. गडचिरोलीचे डीसीएफ यांनीही ही घटना त्यांच्या कार्यक्षेत्रात नसल्याचे सांगत माहिती देण्यास टाळाटाळ केली.

        

या पार्श्वभूमीवर वन विभागाच्या निष्क्रियतेबद्दल नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. तसेच, जखमी वन्यप्राण्याजवळ जाण्याचा अति उत्साह नागरिकांसाठी किती धोकादायक ठरू शकतो, याचेही हे जिवंत उदाहरण असल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून,नागरिकांनी वन्यप्राण्यांपासून सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !