आरमोरी तालुक्यातील देलोडा बुज येथील युवकाचा विसोरा SRPF भरतीच्या शारीरीक चाचणी दरम्यान अचानक पडून मृत्यू.
📍" मृत्यू झाल्याने सर्वत्र शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे."
एस.के.24 तास
गडचिरोली : एसआरपीएफ भरतीच्या शारीरीक चाचणी दरम्यान धावत असताना अचानक पडल्याने एका युवकाचा मृत्यु झाल्याची घटना ६ एप्रिल रोजी सोमवारला सकाळी 8:30.वा.च्या सुमारास घडली.आशिष भास्कर म्हशाखेत्री वय,21 वर्ष रा.देलोडा बुज.ता.आरमोरी असे मृतक युवकाचे नाव आहे.
भारत राखीव बटालियन - 4 अंतर्गत राज्य राखीव पोलिस बल गट क्र.17, चंद्रपूर येथील आस्थापनेवरील सशस्त्र पोलिस शिपाई संवर्गातील 244 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. राज्य राखीव पोलिस बल गट क्र.13,विसोरा,ता. (देसाईगंज) येथील कवायत मैदानावर 31 मार्चपासून शारीरिक चाचणीला सुरुवात झाली आहे.
विसोरा येथील एसआरपीएफच्या कवायत मैदानावर 31 मार्च पासून शारीरिक चाचणीला सुरुवात झाली असून 10 एप्रिल पर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. दररोज जवळपास 1000 उमेदवारांची चाचणी घेतली जात आहे. भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची उपस्थिती पहाटे 2:00.वा.पासूनच दिसून येत असून रात्रीपासूनच हजारो युवक कवायत मैदानावर दाखल होत आहेत. त्यामुळे परिसरात मोठी गर्दी होत आहे. संपूर्ण प्रक्रिया सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली पार पडत असून प्रत्येक टप्प्यावर काटेकोर नियंत्रण ठेवले जात आहे.
उन्हाचा त्रास टाळण्यासाठी शारीरिक चाचणी पहाटे 4 ते सकाळी 9 या वेळेत घेतली जात आहे. दरम्यान देलोडा येथील युवक आशिष म्हशाखेत्री शारीरीक चाचणीसाठी पहाटेला विसोरा येथील कवायत मैदानावर हजर झाला.सीआरपीएफचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत तो धावला.धावत असताना शेवटच्या क्षणी धावपट्टीच्या सीमारेषेवर आशिष अचानक पडला.
तो शुध्दीवर होता त्याला नेमके काय होतय,हे स्पष्ट उपस्थित डॉक्टर व सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांना सांगता आले नाही.लागलीच आशिषला देसाईगंज येथील ग्रामिण रूग्णालयात भरती करण्यात आले.उपचार सुरू असतानाच 10 ते 15 मिनिटांत आशिषची प्राणज्योत मालवली.या घटनेची नोंद देसाईगंज पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.

