शरीर सुखासाठी तुझ्या मुलीला पाठव 10 हजार देतो ; पोलीस कोठडीतील आरोपी महिलेकडे सहायक पोलीस उपनिरीक्षककाची मागणी.
📍वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन संबंधित पोलिसाला तात्काळ निलंबित करुन विनयभंगाचा गुन्हा दाखल.
एस.के.24 तास
अकोला : " सदरक्षणाय खलनिग्रहणाय " हे ब्रीदवाक्य घेऊन सर्वसामान्य जनतेच्या संरक्षणाची मोठी जबाबदारी असलेल्या पोलीस दलातील सहायक पोलीस उपनिरीक्षक रक्षक होण्याऐवजी भक्षक झाला.पोलीस कोठडीतील आरोपी महिलेकडे " तुझ्या मुलीला शरीरसुखासाठी पाठव,10 हजार रुपये देतो " अशी धक्कादायक मागणी.
कर्तव्यावरील पोलिसांनी अकोल्यातील पोलीस ठाण्यातच केल्यामुळे मोठी खळबळ उडाली.या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन संबंधित पोलिसाला तात्काळ निलंबित केले असून त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
सहायक पोलीस उपनिरीक्षक (ASI) राजेश जाधव असे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या पोलिसाचे नाव आहे. पोलीस कोठडीत देखील आता महिला सुरक्षित नाहीत का ? असा गंभीर प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला.राज्यात महिलांवरील अत्याचाराची विविध प्रकरणे सध्या चर्चेत आहेत.
यातील आरोपींवर कारवाई सुरू असतानाच पोलीस तपासामध्ये विविध धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच अकोला शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला.
आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात अकोला पोलिसांनी एका महिलेला अटक केली. या महिलेला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावल्यामुळे सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या कोठडीमध्ये आरोपी महिलेला ठेवण्यात आले.पोलीस ठाण्यातील कर्तव्यावरील ASI राजेश जाधव याने महिलेकडे काल रात्री शरीर सुखाची मागणी केली.
पैशांचे आमिष दाखवले. मुलीला शरीरसुखासाठी पाठव, अशी धक्कादायक मागणी त्याने केली.संबंधित महिलेने या प्रकाराची तक्रार आज वरिष्ठांकडे केली.त्यामुळे पोलीस दलात चांगलीच खळखळ उडाली.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित आरोपी एएसआयला खडेबोल सुनावले. " वर्दी घातली आहेस ना तू…असे कृत्य करताना तुला लाज वाटली नाही का ? " अशा शब्दांत वरिष्ठांनी त्याचा समाचार घेतला.
या प्रकरणाची एक चित्रफित समाजमाध्यमातून प्रसारित झाली.त्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हात देखील उभारल्याचे दिसते.संबंधिताने वर्दी घातली असल्याने त्यांनी स्वतःला आवरले.राजेश जाधव विरुद्ध विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला निलंबित केले आहे. या प्रकरणामुळे अकोल्यासह संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. पोलीस कोठडीत देखील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर आला.

