आरमोरी येथे हनी ट्रॅप'मध्ये अडकवून खंडणी उकळले विषप्रयोग करून तरुणाचा जीव घेण्याचा प्रयत्न ; तरुणीसह दोघांना अटक.
📍खंडणी आणि खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल.
एस.के.24 तास
आरमोरी : प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणाला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवणे, त्यानंतर बदनामीची भीती दाखवून लाखो रुपये उकळणे आणि शेवटी मागणी पूर्ण न झाल्याने त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, असा धक्कादायक प्रकार आरमोरीत उघडकीस आला आहे.आरोपींनी संबंधित तरुणाला बेदम मारहाण करून बळजबरीने कीटकनाशक पाजल्याची खळबळजनक घटना 3 एप्रिल रोजी समोर आली.
या प्रकरणी आरमोरी पोलिसांनी एका तरुणीसह तिच्या 2 साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,आरमोरी येथील 26 वर्षीय तरुणाचे एका 23 वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध होते.कालांतराने या तरुणीच्या आयुष्यात दुसऱ्या प्रियकराची एन्ट्री झाली आणि त्यांच्यात वादाची ठिणगी पडली.याच वादाचा फायदा घेण्यासाठी तरुणीच्या 2 साथीदारांनी मध्यस्थीचा आव आणला.
तुझे चॅटिंग आमच्याकडे आहे,ते व्हायरल करून तुझ्या कुटुंबाला उद्ध्वस्त करू, अशी धमकी देत या त्रिकुटाने ब्लॅकमेलिंगचे जाळे विणले. बदनामीच्या भीतीपोटी पीडित तरुणाने आतापर्यंत सुमारे 4 लाख रुपये या टोळीला दिले होते.
एवढी मोठी रक्कम उकळूनही आरोपींचे समाधान झाले नाही. त्यांनी तरुणाकडे आणखी 15 लाख रुपयांची मागणी केली.पैसे दे नाहीतर मरून जा, अन्यथा आम्ही तुला संपवू, अशी धमकी त्याला देण्यात आली.13 मार्च 2026 रोजी पीडित तरुण ब्रह्मपुरी मार्गाने जात असताना आरोपींनी त्याला वाटेत गाठले.त्याला बेदम मारहाण करून बळजबरीने शेतीसाठी वापरले जाणारे कीटकनाशक पाजले.तरुण निपचित पडल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.
गुन्ह्यातून वाचण्यासाठी आरोपींनी या घटनेला आत्महत्येचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. तरुणाला विष पाजल्यानंतर त्याच्याच मोबाइलवरून वडिलांना ‘बाबा मला माफ करा’ असा संदेश पाठवण्यात आला. तसेच विषाच्या बाटलीचा फोटो तरुणीच्या मोबाइलवर पाठवून प्रेमातून त्याने आत्महत्या केल्याचे भासवले.
विषप्राशनामुळे तरुणाची प्रकृती खालावल्याने त्याला तातडीने नागपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते.अनेक दिवस तो मृत्यूशी झुंज देत होता. 3 एप्रिल रोजी तो शुद्धीवर आल्यानंतर त्याने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. या धक्कादायक खुलाशामुळे पोलीसही चक्रावून गेले आहेत.
पीडित तरुणाच्या तक्रारीवरून आरमोरी पोलिसांनी श्रेया हेमके,नितीन जोध आणि राजू अंबानी (सर्व रा.आरमोरी) यांच्याविरुद्ध खंडणी आणि खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या टोळीने अन्य कुणाला असेच जाळ्यात ओढले आहे का,याचा तपासदेखील सुरू असून आरोपींचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक कैलास गवते यांनी दिली आहे.