सावली तालुक्यातील डोनाळा येथील कुरमार समाजातील मुलगा बनला पोलीस उपनिरीक्षक ; एम.पी.एस.सी.तून भरारी.
सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक
सावली : संघर्ष,जिद्द,चिकाटी आणि आत्मविश्वास या सर्वांच्या जोरावर सावली तालुक्यातील डोनाळा येथील गुराखीच्या मुलाने पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घालत आपल्या आई,वडिलांचे स्वप्न पूर्ण केले.राकेश बंडूजी अल्लीवार असे या मुलाचे नाव आहे.
सावली तालुक्यातील डोनाळा येथील कौशल्याबाई व बंडू अल्लीवार हे मूळचे मूल तालुक्यातील जुनासुर्ला येथील मेंढपाळ व्यवसायातील कुरमार जातीतील.परंतु कुटुंबाची परिस्थिती बिकट असल्याने मेंढया- गुरे राखण्यासाठी 30 वर्षांपूर्वी डोनाळा येथे स्थायिक झाले.आई वडील दोन्ही अशिक्षित असताना व जवळच्या नातेवाईकांना शिक्षणाचा गंध नसताना राकेश मात्र शिक्षणात हुशार होता.
प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा डोनाळा येथून तर माध्यमिक शिक्षण भय्याजी पा. भांडेकर हायस्कूल ,कापसी येथून पूर्ण करून गडचिरोली येथे इलेक्ट्रिक इंजिनियर ची पदवी पूर्ण केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेकडे वळत अभ्यासाला सुरवात केली.
वनपरीक्षेत्र,तलाठी,एसटीआय,एएसओ या पदावर प्रतीक्षा यादीत येत थोडक्यात संधी हुकली परंतु जिद्द सोडली नाही. माझ्याकडे हे नाही ते नाही असे न म्हणता फक्त मेहनतीच्या बळावर असाध्य ते साध्य करता येते याचा प्रत्यय राकेश ने आणून देत पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली.
या यशात आई,वडील,बहीण, भाऊजी यांची साथ व आशीर्वाद असल्याचे त्यांनी सांगितले.