परंपरेला फाटा देत डोंगर हळदीत झाला सत्यशोधक पद्धतीने विवाह अक्षतां ऐवजी फुलांचा वर्षाव.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
पोंभूर्णा : विवाह सोहळा अनेकांसाठी महत्वाचा क्षण असतो.विवाह सोहळा अविस्मरणीय करण्यासाठी बहुजन वर्गात आजही मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल करून पैशाची लयलूट होताना दिसते. मात्र याला अपवाद ठरला तो डोंगर हळदी गावातील ढोले आणि फिस्कुटी येथील लेनगुरे परिवारातील विवाह सोहळा.गुरूवार दि.१ मे गुरूवारला जानीताई आणि नंदकिशोर ढोले रा.डोंगरहळदी यांचे जेष्ठ चिरंजीव विजय ढोले यांचा विवाह फिस्कुटी येथील सुमन आणि नंदाजी लेनगुरे यांची कनिष्ठ कन्या सोनू हिच्याशी सत्यशोधक पद्धतीने झाला.
या विवाह सोहळ्यात अक्षतांऐवजी फुलांचा वर्षाव करून व कोणतेही पौरोहित्य न करता महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिप्रेत असलेला सत्यशोधक विवाह त्यांनी घडवून आणला.
सर्वप्रथम वर-वधू आणि त्यांच्या आप्तेष्टांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करून वंदन केले.या प्रसंगी अक्षता म्हणून धान्याऐवजी फुलांचा वापर करण्यात आला. त्यानंतर सत्यशोधक विधिकर्ते सुनील कावळे यांनी महात्मा फुले लिखित मंगलाष्टकांचे गायन केले. त्यानंतर लगेच सत्यपुजा सांगून वर-वधूला प्रतिज्ञा दिली.
या कार्यक्रमाला डॉ.अभिलाषा गावतुरे,भुजंगराव ढोले, सद्गुरू ढोले,जनार्दन लेनगुरे,श्रीकांत शेंडे, संजय वाढई,ज्योती बुरांडे,भंजदेव प्रदाने,दुषांत रामटेके यांची उपस्थिती होती.तसेच गावातील मंडळी आणि आप्त परिवार उपस्थित होते.