शिक्षक,महाविद्यालय व्यवस्थापनाकडून छळ,व्हिडिओ समाजमाध्यमावर टाकून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न.
📍चामोर्शी येथील केवळरामजी हरडे कृषी महाविद्यालयात येथील घटना ; महाविद्यालय खाजगी असून तुम्हा सर्वांना अनेक वर्ष एकाच वर्गात बसाविले जाईल अशी धमकी.
एस.के.24 तास
चामोर्शी : जिल्ह्यातील चामोर्शी येथील केवळरामजी हरडे कृषी महाविद्यालयात तृतीय वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्याने शिक्षक आणि व्यवस्थापनावर गंभीर आरोप करीत आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे. अनिकेत गजेंद्र सोनटक्के वय,24 वर्ष,रा.आरमोरी) असे विद्यार्थ्याचे नाव असून त्याने आत्महत्या करीत असल्यासंदर्भातले पत्र व चित्रफित समाजमाध्यमावर प्रसारित केली होती.सद्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर असून जिल्हा रुग्णालय गडचिरोली येथे उपचार सुरू आहे.
5 जुलै रोजी केवळरामजी हरडे कृषी महाविद्यालयात पदवीच्या तृतीय वर्षाला शिकणाऱ्या अनिकेत गजेंद्र सोनटक्के या विद्यार्थ्याची चित्रफित आणि पत्र समाजमाध्यमावर सार्वत्रिक झाले.
त्याने महाविद्यालय प्रशासनाकडून होत असलेल्या छळामुळे आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. त्याच्या म्हणण्यानुसार,महाविद्यालयातील शिक्षक, कर्मचारी तुषार भांडारकर, पवन बुधबावरे आणि व्यवस्थापनाकडून अनेक दिवसांपासून मानसिक त्रास सुरु आहे.
विरोध केल्यास अनुत्तीर्ण करण्याची धमकी देण्यात येते. शिक्षकवर्गाकडून विद्यार्थ्यांचे शोषण केल्या जात आहे. कमी गुण देऊन त्यांच्या भविष्याशी खेळले जात आहे. हे महाविद्यालय खाजगी असून तुम्हा सर्वांना अनेक वर्ष एकाच वर्गात बसाविले जाईल अशी धमकी देण्यात येते. तक्रार केल्यास त्या विद्यार्थ्यांचा छळ केला जातो.
महाविद्यालयात गरीब आणि शेतकरी कुटुंबातील होतकरू विद्यार्थी शिक्षणासाठी प्रवेश घेतात पण येथील शिक्षक आणि व्यवस्थापन छळ करून त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचे काम करीत असल्याचा गंभीर आरोप अनिकेत याने पत्रात केला आहे.
सद्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर असून मानसिक स्थिती बघता डॉक्टरांनी ६ जुलैरोजी पोलिसांना बयान घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे अद्याप कुणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. रुग्णालयाबाहेर विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
तक्रारीकडे व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : -
मागील कित्येक महिन्यांपासून विद्यार्थ्यांचा छळ केला जात आहे. त्यांना धमकी देण्यात येत आहे. त्यांच्याकडून दंडाच्या नावावर रक्कम वसूल करण्यात येत आहे. त्या पैशातून शिक्षक आणि कर्मचारी पार्टी करतात. असा आरोप पिडीत विद्यार्थ्याने केला आहे.
महाविद्यालयात असे गंभीर प्रकार सुरू असताना संस्थाचालक आणि व्यवस्थापन याकडे दुर्लक्ष करीत होते. असे अनिकेतचे म्हणणे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणारे महाविद्यालयातील शिक्षक कर्मचारी आणि त्यांना अभय देणाऱ्या व्यवस्थापनावरही गुन्हे दाखल करावे अशी मागणी करण्यात येत आहे.
ही बाब मला काल रात्रीच्या सुमारास कळली. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमली असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल.- अरुण हरडे,संस्थापक.