कुरखेडा तालुक्यातील शिरपूर येथे एका शेततळ्यात अंघोळीला गेलेल्या दोन सख्या मावस भावंडाचा बुडून दुर्दैवी मृत्यू ; मावशीकडे पाहुणा म्हणून आला अन..
एस.के.24 तास
कुरखेडा : गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील शिरपूर येथे एका शेततळ्यात अंघोळीला गेलेल्या दोन सख्या मावस भावंडाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
विहान ज्ञानेश्वर मडावी वय,12 वर्ष रा.शिरपूर,रुदय मडावी वय,9 वर्ष रा.गडचिरोली अशी मृत भावंडांची नावे आहेत. या घटनेमुळे मडावी कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले असून गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
प्राप्त माहितीनुसार, ६ जुलैरोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास विहान आणि रुदय हे दोघेही सुटी असल्याने गावाजवळील शेतात गेले होते. यावेळी शेततळ्यातील पाणी बघून दोघांनाही अंघोळीचा मोह आवरता आला नाही. दरम्यान, तळ्याच्या काठावर सायकल आणि कपडे काढून ठेवत दोघेही पाण्यात उतरले.
परिसरात आठवडाभरापासून जोरदार पाऊस सुरू असल्याने शेततळे भरले होते. त्यामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले.काही वेळानंतर शेतात जाणाऱ्या गावकऱ्यांना काठावर कपडे आणि सायकल दिसून आली.कुणीही व्यक्ती त्यांना दिसले नाही.
त्यामुळे तळ्याच्या दिशेने पाहणी केली असता दोन लहान मुलांचे मृतदेह तळ्यातील पाण्यावर तरंगताना दिसून आले. त्यांनी सदर घटनेची माहिती लगेच कुरखेडा पोलिसांना दिली.
गावकऱ्यांच्या मदतीने दोन्ही मुलांचे मृतदेह कुरखेडा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. पुढील तपास कुरखेडा पोलीस करीत आहे.
मृतक विहान मडावी याचे वडील शिक्षक असून तो शिवाजी हायस्कूल कुरखेडा येथे सातव्या वर्गात शिकत होता.तर त्याचा मावस भाऊ रूदय हा गडचिरोली येथे शिकत होता.
तो पाहूणा म्हणून शिरपूर येथे मावशीकडे आला होता.त्याचे वडील गडचिरोली पोलीस दलात कार्यरत आहेत.दोन्ही चिमूकल्यांच्या मृत्यूने परीसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.