वडसा मार्गावरील धर्मकाट्याजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर धडकले 2 दुचाकीस्वार,1 विद्यार्थी गंभीर.
📍रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या गाड्यांवर कारवाई करा.
एस.के.24 तास
कुरखेडा : गेवर्धा येथून कुरखेडाकडे संगणक प्रशिक्षणासाठी येत असलेल्या दोन विद्यार्थ्यांची दुचाकी वडसा मार्गावरील धर्मकाट्याजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली. या अपघातात कुणाल डांबोळे वय,18 वर्ष हा युवक गंभीर जखमी झाला.त्याच्या सोबत असलेला कृणाल कांबळे वय,19 वर्ष यालाही किरकोळ दुखापत झाली आहे.
कुणाल आणि कृणाल यांची दुचाकी क्रमांक MH.33 R 9564 वडसा मार्गावर वजनासाठी थांबलेल्या ट्रकवर क्रमांक CG 04 HW3029) मागून धडकली. या धडकेत कुणालच्या डोक्याला जबर मार लागल्याने रक्तस्त्राव सुरू झाला. याच मार्गाने वडसा येथे निघालेले आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष नासिर हाशमी यांनी तत्काळ त्या अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धाव घेत जखमी युवकांना कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली. त्यांनी या घटनेची माहिती कुरखेडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेंद्र वाघ यांना दिली.
कुरखेडा येथे प्राथमिक उपचारानंतर कुणालची प्रकृती गंभीर असल्याने त्याला ब्रम्हपुरी येथील रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे तपासणीत त्याला मल्टिपल फ्रॅक्चर असल्याचे निदान झाले. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.
रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या गाड्यांवर कारवाई करा
हाशमी यांनी रस्त्यावर वाहन उभे ठेवून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या आणि लोकांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या ट्रक चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कुरखेडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून सदर ट्रकला ताब्यात घेतले. चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात रस्त्यावरील वाहन पार्किंगच्या समस्येवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.