आई वडीला विना पोरक्या दोन चिमुरड्यांना अखिल कुणबी समाजाची १ लाख ५१०००/- ची आर्थिक मदत.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक.
ब्रम्हपुरी : दि,३१/०८/२५ ब्रह्मपुरी तालुक्यातील अ-हेरनवरगांव येथील दोन चिमुरड्या काही दिवसांतच आई-वडिलांच्या छत्रछायेशिवाय पोरक्या झाल्या ही हृदयद्रावक घटना समाजाला अंतर्मुख करणारी ठरली आहे.
अवघ्या दोन महिन्यांपूर्वी (जुन - २५)वडिलांचे, तर दहा दिवसांपूर्वी पोळा सणाच्या दिवशी आईचे दुःखद निधन झाल्याने प्राजक्ता वय सात वर्ष व शुभ्रा वय दीड वर्ष या दोन चिमुरड्यांवर व तिच्या आजी सुलोचना व आजोबा वसंता ठेंगरे यांच्या कुटुंबावर दुःखांचे संकट कोसळले.
त्यांच्या आयुष्याच्या कोवळ्या वयातच असे दुःख ओढवणे ही काळजाला पिळवटून टाकणारी घटना आहे. मात्र या दुर्दैवी प्रसंगी ब्रह्मपुरी तालुक्यातील कुणबी समाजाने सामाजिक दायित्वाची जाणीव जोपासत पुढाकार घेतला आणि या दोन बालिकांच्या भविष्यासाठी आधाराचा हात दिला.
अखिल कुणबी समाज,ब्रम्हपुरी यांच्या वतीने अ-हेरनवरगांव येथे चिमुरड्यांच्या आजी-आजोबांकडे प्रत्यक्ष घरी जाऊन मदत देण्यात आली. समाजाच्या वतीने त्यांना ११ हजार रुपये रोख स्वरूपात तर १ लाख ४० हजार रुपये फिक्स डिपॉझिट या माध्यमातून त्यांच्या उज्वल भविष्यासाठी सुरक्षित ठेवण्यात आले.अशा प्रकारे एकूण १ लाख ५१ हजार रुपयांची मदत अनाथ बालिकांसाठी देण्यात आली.
यावेळी गावातील मान्यवर सतीश ठेंगरे, विलास उरकुडे माजी उपसभापती,संजु ढोरे आणि मोहल्यातील समाज बांधव, ग्रामस्थ, तसेच त्यांच्या मामा-मामी, आजी-आजोबा, काका-काकी व आप्तेष्ट मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सांत्वनपर वातावरणात झालेल्या या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी दुःखात उभे राहतांना फक्त भावनिक आधार न देता ठोस स्वरूपातील आर्थिक मदत करणे हीच खरी समाजभावना असल्याचे अधोरेखित केले.
समाजाचा हा उपक्रम केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित नसून त्या दोन चिमुरड्यांच्या भविष्यातील शिक्षण, संगोपन व उज्ज्वल वाटचालीची जबाबदारी सामूहिकपणे स्वीकारण्याचा संदेश देणारा आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यातील कुणबी समाजाने केलेला हा आदर्श उपक्रम इतरांना प्रेरणा देणारा ठरावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
या कार्यक्रमात प्रसंगी ब्रह्मपुरी तालुका कुणबी समाजाच्या वतीने प्रेमलाल धोटे, अशोक पिलारे, महिंद्र मातेरे , अॅड नाकतोडे, राजेश पारधी, निहाल ढोरे, मनोज वझाडे, अशोक पिलारे, अवी राऊत , प्रणय सोंदरकर व अन्य प्रतिष्ठित समाज बांधव उपस्थित होते.